गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहते ज्या खेळाडूची मैदानावर येण्याची वाट पाहत होते अखेर त्याला अंतिम 11 मध्ये घेण्यात आले आहे. भारताचा अनुभवी जलद गोलंदाज मोहम्मद शमीला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात संघात स्थान देण्यात आले आहे. अर्शदीप सिंगच्या जागी शमीला संधी देण्यात आली आहे.
भारताचा संघ ( India Playing XI)-संजू सॅमसन , अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या लढतीत विजय मिळून टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे. मालिका विजयाची संधी असलेल्या या सामन्यात भारताने सर्वात अनुभवी मोहम्मद शमीला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे भारताच्या गोलंदाजीची धार आणखी वाढली आहे.
दुखापतीमुळे मोहम्मद शमी गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध होईल असे वाटले होते. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून त्याला NOC मिळाली नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी टीम इंडियासाठी तो पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेनंतर 3 सामन्यांची वनडे मालिका देखील होणार आहे.
