सिराजला अश्रू अनावर
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील 22 धावांच्या हृदयद्रावक पराभवानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विजयाच्या अगदी जवळ पोहोचूनही, अखेरचा गडी म्हणून तोच बाद झाल्याने सिराजला अश्रू अनावर झाले. 90 मिनिटं मैदानावर झुंजल्यानंतर पराभव स्विकारणं सिराजला मान्य नव्हचं. 90 मिनिटंच काय तर पाच दिवसाच्या मेहनतीवर विर्जन पडलं होतं. तर दुसरीकडे दिवसभर बॅटिंग करणाऱ्या जडेजाला देखील भावना अनावर झाल्या.
advertisement
इंग्लंडच्या खेळाडूंकडून सांत्वन
लॉर्ड्सवर झालेला पराभव हा क्षण भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत वेदनादायी होता. सिराजला देखील भावना अनावर झाल्या. सिराज त्याच ठिकाणी मैदानावर गुडघे टेकून बसला आणि त्याचे डोळे पाणावले होते. सिराजला या स्थितीत पाहून इंग्लंडच्या काही खेळाडूंनी मैदानावरच त्याला सांत्वन दिले. हॅरी ब्रूक, जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स हे सिराजकडे धावले आणि त्यांनी त्याला धीर दिला.
जडेजाचा प्रेरणादायी लढा
प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी दाखवलेल्या या खेळीमेळीच्या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 2005 च्या ॲशेस कसोटीतील ॲन्ड्र्यू फ्लिंटॉफने मायकल कॅस्प्रोविझला दिलेल्या सांत्वनाची आठवण या क्षणाने अनेकांना करून दिली. लॉर्ड्सवरील हा पराभव भारतीय संघासाठी नक्कीच निराशाजनक असला तरी, सिराज आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंनी अखेरपर्यंत दिलेला लढा प्रेरणादायी ठरला, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.