चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड शनिवारच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करू शकतो, असे वृत्त द इंडियन एक्सप्रेस दिले आहे. चेन्नईकडे कर्णधारपदासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे धोनीसाठी पुन्हा एकदा कर्णधार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एमएस धोनीने यापूर्वी 2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व केले होते. ज्यामध्ये त्यांनी गुजरात टायटन्सला हरवून संघाला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते.
advertisement
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान तुषार देशपांडेच्या चेंडूने गायकवाडच्या हाताच्या पुढच्या भागाला (forearm) दुखापत झाली होती. दुखापत होऊनही त्याने फलंदाजी करणे सुरू ठेवले. परंतु त्यानंतर तो सरावासाठी उतरलेला नाही. सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड हसी यांनी सांगितले की, त्याच्या नेटमधील सत्रानंतर खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना हसी म्हणाले, होय, आम्हाला आशा आहे की तो सरावासाठी फलंदाजीचा प्रयत्न करेल. मात्र त्याला अजूनही थोडा त्रास होत आहे. आम्हाला खूप आशा आहे आणि विश्वास आहे की तो उद्या (शनिवारी) ठीक होईल.
गायकवाडच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करेल, असे विचारले असता हसी म्हणाले की, त्यांनी याबद्दल जास्त विचार केला नाही. पण त्यांनी धोनीच्या नावाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. मला खात्री आहे की मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि ऋतुराजने त्याबद्दल विचार केला असेल.
धोनीने 2023 च्या हंगामानंतर कर्णधारपद सोडले होते. मात्र अनेकदा त्याच्या सामन्यांमधील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. हंगामापूर्वी त्याने हे स्पष्ट केले होते की, त्याच्याकडून गायकवाडकडे कर्णधारपदाचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. मैदानावर बहुतेक निर्णय ऋतुराजच घेतो.
चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे आणि ते दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहेत. दिल्लीने पहिले दोन सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाड जर शनिवारच्या सामन्यात खेळू शकला नाही. तर अनुभवी एमएस धोनी पुन्हा एकदा सीएसकेच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसेल.