तीन टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
कॅनडासह अफगाणिस्तान आणि युएईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे या तिन्ही संघाना गाळा गुंडाळावा लागणार आहे. न्यूझीलंड आणि कॅनडामधील या मॅचमध्ये कॅनडाचा कॅप्टन दिलप्रीत सिंह बाजवा याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी पोषक खेळपट्टीवर कॅनडाने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 173 रन्स केले. कॅनडाकडून युवराज सामरा याने शानदार खेळ करत केवळ 58 बॉल्समध्ये शतक ठोकले, मात्र इतर बॅटर्सना त्याला मोठी साथ देता आली नाही.
advertisement
ग्लेन फिलिप्स आणि रचिन रविंद्र
कॅनडाचा कॅप्टन बाजवा याने 36 रन्स केले खरे, पण त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षाही कमी होता, ज्यामुळे टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसरीकडे न्यूझीलंडच्या बॉलर्सनी शिस्तबद्ध बॉलिंग करत कॅनडाच्या रन्सवर अंकुश ठेवला. 174 रन्सचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती आणि त्यांच्या 2 विकेट्स लवकर पडल्या होत्या. न्यूझीलंड संकटात असताना ग्लेन फिलिप्स आणि रचिन रविंद्र या जोडीने मॅचची सूत्रे आपल्या हातात घेतली.
न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावला
दरम्यान, फिलिप्सने आक्रमक 76 रन्सची खेळी केली, तर रचिनने 59 रन्स करून त्याला मोलाची साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने हे आव्हान केवळ 16 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केले आणि आपला नेट रन रेटही सुधारला. लीग स्टेजमधील 4 मॅचेसपैकी हा न्यूझीलंडचा तिसरा विजय ठरला आहे. या विजयामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावला असून आता सुपर-8 मध्ये त्यांची टक्कर मोठ्या संघांशी होणार आहे.
