पुणे : अगदी बालपणापासूनच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चिमुकली मुलंही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेऊ शकतात. पुण्यातील 7 वर्षांच्या चिमुकलीनं हेच दाखवून दिलंय. साडेतीन वर्षांची असताना स्केटिंग सुरू करणाऱ्या मनस्वी पिंपरे हिनं 3 वर्षांत सुवर्णपदकांचं शेतक पूर्ण केलंय. विशेष म्हणजे तिच्या कामगिरीची दखल अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली असून काही जागतिक विक्रमही तिने आपल्या नावे केले आहेत. तिच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण एका सामान्य कुटुंबातील चिमुकलीच्या यशाचं रहस्य नेमकं काय? हेच आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
advertisement
पुण्यातील कोंढावा बुद्रुक भागात राहणारी मनस्वी पिंपरे ही सात वर्षाची स्केटर आहे. तिचे वडील विशाल पिंपरे ई सेवा केंद्र चालवतात. आई-वडिलांच्या लग्नाला 12 वर्षे झाल्यानंतर तिचा जन्म झाला. लेकीनं वेगलं काहीतरी करावं अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे साडेतीन वर्षांची असतानाच त्यांनी मनस्वीला स्केटिंगचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. 9 ऑक्टोबर 2021 रोजी तिने पहिल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकून आपली कारकीर्द सुरू केली. अवघ्या 3 वर्षांत तिने 1 आंतरराष्ट्रीय, 11 राष्ट्रीय, 12 राज्यस्तरीय आणि 65 जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धांमध्ये सहभागी होऊन एकूण 100 सुवर्ण, 14 रजत आणि 12 कांस्य पदके मिळवली आहेत.
कामगार नव्हे कलाकार, PM मोदींची करतो सेम टू सेम मिमिक्री, चहावाल्या मंगेशचा VIDEO पाहाच
कसा आहे 100 पदकांचा प्रवास?
मनस्वीने केवळ 3 वर्षे 6 महिन्यांची असताना स्केटिंग प्रशिक्षणाला सुरुवात केली. वयाच्या 4थ्या वर्षी मालदीव येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 3 सुवर्णपदके, वयाच्या 5व्या वर्षी 50 मीटर फायर लिंबो स्केटिंगसाठी वर्ल्ड रेकॉर्ड केला. वयाच्या 6व्या वर्षी 16.5 इंच उंचीच्या मोबाईलच्या खालून स्केटिंग करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या विक्रमाची नोंद झाली आणि ती जगातील सर्वात लहान वयाची विक्रमवीर ठरली. 7व्या वर्षी 100 सुवर्ण पदकांचा विक्रम करून तिने आता नवा विश्वविक्रम केला आहे.
आशियाई स्पर्धेत गोल्ड जिंकायचंय
मनस्वीला रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी, कात्रज येथे विजय मलजी यांचे प्रशिक्षण लाभले आहे. तिच्या शाळेचे नाव मारुती बधे मेमोरियल स्कूल असून पालकांचा विशेष पाठिंबा आहे. तिने घेतलेला कठोर परिश्रम आणि सराव यामुळे तिने ही कामगिरी केलीये. पुढच्या वर्षी महाराष्ट्रासाठी नॅशनल मधून सुवर्णं पदक तर वयाच्या 16 व्या वर्षी एशियन गेम मधून भारतासाठी गोल्ड मेडलं आणावं यासाठी आतापासून ती प्रयत्न करत आहे, अशी माहिती मनस्वीचे वडील विशाल पिंपरे यांनी दिली आहे.