पुणे : भारतीयांचं क्रिकेटवेड आख्ख्या जगाला माहितीये. अनेकजण क्रिकेट पाहण्यात तासनतास घालवत असतात. पण पुण्यातील एका इंजिनिअरचं क्रिकेटवेड यापेक्षा वेगळंच आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे पराग किनिकर यांनी अनोखा छंदच जोपासला आहे. 1996 पासून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळाडूंच्या फोटोंचा संग्रह करत आहेत. पेपरमधील कात्रणांतून गोळा केलेले सुमारे 13 हजार पेक्षा जास्त फोटो त्यांच्याकडे आहेत. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
सिहंगड रोड परिसरात राहणारे पराग हे केवळ क्रिकेटप्रेमीच नाही, तर त्या प्रेमाचे एक जिवंत उदाहरण आहेत. 1996 सालापासून त्यांनी सुरू केलेला क्रिकेट खेळाडूंच्या फोटो कात्रणांचा संग्रह आज एक अनोखी ठेव बनली आहे. या छंदातून त्यांनी आजपर्यंत सुमारे 13,000 पेक्षा अधिक फोटो कात्रणं जमा केली आहेत, जी त्यांनी 187 कार्डशीटवर लावली आहेत.
कशी झाली सुरुवात?
पराग आपल्या क्रिकेट प्रेमाबद्दल सांगतात की, “क्रिकेटची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. 1996 पासून मी वर्तमानपत्रांतील क्रिकेटर्सचे फोटो कापून एका डायरीत लावत होतो. सुरुवातीला ते फक्त स्वतःसाठी होते, पण जसजसे फोटो वाढत गेले, तसतसे हे एक वैयक्तिक संग्रहालयच तयार झाले. आज या कलेक्शनमध्ये सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत, अनेक पिढ्यांचे खेळाडू सामील आहेत. एकेका फोटोमागे एकेक आठवण जिवंत होते.”
केवळ आवड म्हणून..
या संपूर्ण उपक्रमामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. हे मी केवळ आवडीपोटी करत आलो आहे. यातून मिळणारा निखळ आनंदच हे सगळं चालवायला ऊर्जा देतो. हे फोटो पाहिल्यावर त्या त्या मॅचची, त्या काळाची आठवण ताजी होते. यातून मला अतिशय आनंद मिळतो,” असंही पराग सांगतात.
दरम्यान, पराग किनिकर यांचा हा छंद केवळ एक संग्रह नव्हे, तर एका खेळाविषयीची निष्ठा, आठवणी आणि प्रेमाचे प्रतीक आहे. भविष्यात त्यांनी या संग्रहाचे प्रदर्शन भरवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे, जेणेकरून इतर क्रिकेटप्रेमीही या आठवणींमध्ये रमू शकतील.





