आयपीएलमध्ये 2020पासून प्रत्येक हंगामातील पहिल्या सामन्यात वादळी अर्धशतक किंवा शतक ठोकणारा 'मिस्टर ओपनिंग मॅच' म्हणून ओळखला जाणारा संजू सॅमसन यंदा अपयशी ठरला आहे. राजस्थान रॉयल्समधून ट्रेड होऊन चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीत आलेल्या संजूकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र नान्द्रे बर्गरच्या एका भेदक चेंडूने संजूचा 6 वर्षांचा न मोडणारा विक्रम संपुष्टात आणला.
advertisement
2020 नंतर प्रथमच IPL हंगामाच्या पहिल्याच सामन्यात सॅमसनला मोठी खेळी करता आली नाही. सॅमसन अवघ्या 6 धावा (7 चेंडू) करून बाद झाला आणि त्याची सातत्यपूर्ण दमदार सुरुवातीची परंपरा खंडित झाली. गेल्या सहा हंगामांमध्ये सॅमसनने पहिल्या सामन्यात नेहमीच 50+ धावांची खेळी केली होती. 2021 मध्ये त्याने 119 धावांची स्फोटक खेळी केली होती, तर 2024 मध्ये नाबाद 82 धावा करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली होती.
दबदबा संपला
2020 पासून संजू सॅमसनने आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात धावांचा पाऊस पाडला होता. त्याची मागील 6 वर्षांतील पहिल्या सामन्यातील कामगिरी थक्क करणारी होती.
2020 – 74 (32) vs CSK
2021 – 119 (63) vs PBKS
2022 – 55 (27) vs SRH
2023 – 55 (32) vs SRH
2024 – 82* (52) vs LSG
2025 – 66 (37) vs SRH
2026 – 6 (7) vs CSK
जुन्या संघाविरुद्धच घात झाला
संजूने ज्या राजस्थान रॉयल्सचे वर्षानुवर्षे नेतृत्व केले, त्याच संघाविरुद्ध आज तो आपला पहिला सामना खेळायला उतरला होता. जोफ्रा आर्चरच्या पहिल्या ओव्हरमध्ये संजूने एक चौकार मारून आश्वासक सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या षटकात नान्द्रे बर्गरने टाकलेला १४०.२ किमी प्रतितास वेगाचा चेंडू संजूला समजलाच नाही आणि त्याचा ऑफ-स्टंप हवेत उडाला. अवघ्या 7 चेंडूत 6 धावा करून संजू माघारी परतला.
चेन्नईची खराब सुरुवात
संजू सॅमसनच्या या स्वस्त सुटकेमुळे चेन्नई सुपर किंग्सची अवस्था बिकट झाली. संजूपाठोपाठ कर्णधार ऋतुराज गायकवाड (6) आणि आयुष म्हात्रे (0) देखील स्वस्तात बाद झाले. आयपीएल 2026 च्या या सलामीच्या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी (विशेषतः नान्द्रे बर्गर आणि जोफ्रा आर्चर) चेन्नईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
संजूने नुकत्याच झालेल्या 2026 टी-20 विश्वचषकात 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' किताब पटकावला होता, त्यामुळे त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र आयपीएलच्या पहिल्या सामन्यातील त्याचे 'बॅटिंग पॉवरहाऊस' हे बिरूद यंदा टिकू शकले नाही.
