टी-20 वर्ल्ड कपसाठी सलामीवीर म्हणून निवड झालेल्या संजू सॅमसनचा या मालिकेत बॅट अजिबात चाललेली नाही. पहिल्या दोन सामन्यांत स्वस्तात बाद झाल्यानंतर गुवाहाटीत मोठी खेळी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तिसऱ्या सामन्यात तर त्यांचे खातेही उघडले नाही. पारीच्या पहिल्याच चेंडूवर सॅमसन बाद झाले आणि त्यांच्या टी-20 कारकिर्दीवर कायमचा डाग लागला.
advertisement
पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड
154 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरले. समोर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री होता. हेन्रीने टाकलेला पहिलाच लेंथ बॉल थेट स्टंप्स उडवत गेला आणि संजू सॅमसन ‘गोल्डन डक’ झाले. याआधीच्या दोन सामन्यांत त्यांनी एकूण फक्त 16 धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात 10, तर दुसऱ्यात अवघ्या 6 धावा.
या सामन्यासह संजू सॅमसनने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. असा प्रकार घडणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
या यादीत आधीही मोठी नावे
संजूपूर्वी केएल राहुल, पृथ्वी शॉ आणि टी-20 मधून निवृत्त झालेला रोहित शर्मा यांच्यासोबतही असे घडले आहे. 2016 मध्ये केएल राहुल, 2021 मध्ये पृथ्वी शॉ आणि 2022 मध्ये रोहित शर्मा या यादीत सामील झाले होते.
T20Iच्या पहिल्याच चेंडूवर बाद झालेले भारतीय फलंदाज
केएल राहुल – झिम्बाब्वे विरुद्ध, हरारे (2016)
पृथ्वी शॉ – श्रीलंका विरुद्ध, कोलंबो (2021)
रोहित शर्मा – वेस्ट इंडीज विरुद्ध, बासेतेरे (2022)
संजू सॅमसन – न्यूझीलंड विरुद्ध, गुवाहाटी (2026)
फॉर्म घसरला, स्पर्धा वाढली
2025 पासून संजू सॅमसनचा फॉर्म सातत्याने घसरलेला आहे. आतापर्यंत 9 डावांत त्यांनी केवळ 104 धावा केल्या असून सरासरी 11.55 इतकी आहे. सर्वोच्च धावसंख्या फक्त 37 आहे. या 9 डावांत ते केवळ एकदाच पॉवरप्लेपर्यंत टिकू शकले.
दरम्यान, तिलक वर्मा दुखापतीतून सावरून पुनरागमनासाठी सज्ज आहे आणि ईशान किशनही उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटसमोर संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्यातून एकाची निवड करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याची परिस्थिती पाहता, दमदार पुनरागमन करणाऱ्या ईशान किशनचे पारडे जड दिसत आहे. उर्वरित दोन सामन्यांत संजू सॅमसन धावा करण्यात अपयशी ठरले, तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांना बेंचवर बसावे लागू शकते. अभिषेक शर्मासोबत सलामीसाठी ईशान किशनला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
