शाहीनवर 10 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड
टीम हॉटेलमधील सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शाहीनवर 10 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अंतर्गत चौकशीनंतर ही कडक कारवाई करण्यात आली असून, यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये झिम्बाब्वेचा अनुभवी खेळाडू सिकंदर रजा याचेही नाव समोर आलं आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शाहीन आणि सिकंदर यांनी हॉटेलमध्ये 4 बाहेरील पाहुण्यांना बोलावले होते. या पाहुण्यांना रूमवर नेण्यासाठी पीसीबी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी परवानगी नसताना चार जणं रुमवर बोलवली.
रात्री उशिरा 1:25 वाजेपर्यंत पार्टी?
अधिकाऱ्यांनी नकार देऊनही शाहीन आणि रजा यांनी रात्री 11 च्या सुमारास त्या पाहुण्यांना आपल्या रूमवर नेलं. हे पाहुणे रात्री उशिरा 1:25 वाजेपर्यंत तिथंच उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. अशातच लाहोर कलंदर्सने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पीसीबीला सादर केला आहे. ही घटना नियमांचं जाणीवपूर्वक केलेलं उल्लंघन नसून एका गैरसमजातून घडल्याचं फ्रँचायझीने स्पष्ट केलं आहे.
कॅप्टनची पाठराखण केली पण...
विशेष म्हणजे, शाहीनवर दंड झाला असला तरी सिकंदर रजावर कोणतीही अधिकृत कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या चुकीसाठी सर्वस्व मी जबाबदार आहे, शाहीनला यासाठी दोषी धरले जाऊ नये," असे म्हणत त्याने आपल्या कॅप्टनची पाठराखण केली होती. पण शाहीनवर दंड ठोठावण्यात आलाय. त्यामुळे आता पीसीबीच्या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतायेत.
