सन्मान आणि समान वागणूक दिली नाही
समाजात असलेल्या अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण या कार्यक्रमात सहभागी झालो असल्याचे कनेरिया यांनी सांगितले. मी पाकिस्तानसाठी खेळलो, पण मला तिथे योग्य तो सन्मान आणि समान वागणूक मिळाली नाही. या भेदभावामुळेच मी आज अमेरिकेत आहे, असे त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
इस्लाम धर्म स्वीकारण्यास वारंवार दबाव टाकला
advertisement
पाकिस्तानसाठी ६१ कसोटी सामने खेळलेले कनेरिया हे देशाचे फक्त दुसरे हिंदू क्रिकेटपटू आहेत. त्यांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, शाहीद आफ्रिदी याने त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी वारंवार दबाव टाकला.
मी चांगली कामगिरी करत होतो, काउंटी क्रिकेटही खेळत होतो. इंझमाम-उल-हकने मला खूप पाठिंबा दिला आणि तोच एकमेव कर्णधार होता, ज्याने मला मदत केली. सोबतच शोएब अख्तर देखील चांगल्या नजरेने पाहायचा. पण, शाहीद आफ्रिदी आणि इतर अनेक खेळाडूंनी मला त्रास दिला. त्यांनी माझ्यासोबत जेवणही घेतले नाही. आफ्रिदी तर वारंवार मला धर्म परिवर्तन करण्यास सांगायचा.
पाकिस्तानी क्रिकेटमधील धार्मिक भेदभावाचा गंभीर आरोप
कनेरिया यांनी सांगितले की, इंझमाम-उल-हकने कधीही धर्म बदलण्याची भाषा केली नाही, पण आफ्रिदीसह काही खेळाडूंनी मात्र त्यांच्यावर दबाव आणला. त्यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या समस्या जगभर पोहोचवण्यासाठी आणि योग्य कारवाई व्हावी यासाठी ही माहिती अमेरिकेत मांडल्याचे स्पष्ट केले.
क्रिकेट आणि राजकारणात खळबळ
कनेरिया यांच्या या गौप्यस्फोटाने पाकिस्तानमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याआधीही त्यांनी आपल्यावरील भेदभावाबद्दल बोलले होते, मात्र आता अमेरिकेच्या संसदीय चर्चेत यावर आवाज उठवल्याने हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.