टी-20 वर्ल्ड कपनंतर सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी जाणार असल्याचं वृत्त पीटीआयने काहीच दिवसांपूर्वी दिलं होतं. टी-20 वर्ल्ड कपनंतर सूर्यकुमार यादव कर्णधार राहणार नसेल, तसंच गिलही टीमबाहेर असेल तर मग टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदासाठी बीसीसीआयला पर्याय शोधावा लागणार आहे.
बीसीसीआय नवा कर्णधार शोधत असतानाच टीम इंडियाचा स्टार बॅटर केएल राहुलने संधी साधली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केएल राहुल हा आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने ऑलराऊंडर अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवल्याचं सांगण्यात येत आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्लीने 14 पैकी 7 मॅच जिंकल्या होत्या, पण त्यांना प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं नव्हतं.
advertisement
राहुलने संधी साधली
याआधी आयपीएल 2025 मध्येही केएल राहुलला दिल्लीकडून कॅप्टन्सीची ऑफर देण्यात आली होती, पण त्याने ही ऑफर नाकारल्याचं बोललं गेलं. पण आता टीम इंडियात कॅप्टन्सीची जागा खाली होत असल्यामुळे राहुलने दिल्लीची कॅप्टन्सी स्वीकारली का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी तसंच उत्कृष्ट कॅप्टन्सी केली तर राहुल टी-20 टीमच्या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये येईल. तसंच तो सूर्यकुमार यादवची चौथ्या क्रमांकाची जागाही घेऊ शकतो, त्यामुळे राहुलने भारताच्या टी-20 टीमची कॅप्टन्सी डोळ्यासमोर ठेवून दिल्लीची कॅप्टन्सी स्वीकारली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राहुलचं टी-20 रेकॉर्ड
केएल राहुलने 72 टी-20 सामन्यांमध्ये 37.75 ची सरासरी आणि 139.13 च्या स्ट्राईक रेटने 2265 रन केल्या आहेत, यात 2 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. पण केएल राहुल 2022 नंतर भारताकडून एकही टी-20 मॅच खेळला नाही. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचा इंग्लंडविरुद्ध दारुण पराभव झाला, त्यामुळे केएल राहुलची टीममधून हकालपट्टी झाली, त्यानंतर राहुलला भारताकडून एकही टी-20 मॅच खेळण्याची संधी अजूनपर्यंत मिळालेली नाही.
