दादर युनियनची कॅप
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संग्रहालयात आता सुनील गावस्कर यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक मौल्यवान वस्तू पाहायला मिळणार आहे. गावस्कर यांनी त्यांची दादर युनियनची कॅप संग्रहालयाला भेट दिली आहे आणि त्यामागे एक खास कारण आहे. ही कॅप त्यांच्यासाठी खूप खास होती, कारण 1981 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटी सामन्यात ती त्यांनी घातली होती. त्या मॅचमध्ये कपिल देव यांच्या अविश्वसनीय गोलंदाजीमुळे भारताने एक ऐतिहासिक विजय मिळवला होता.
advertisement
गावस्करांची लकी कॅप
गुडघ्याची दुखापत असूनही कपिल देव यांनी 16.4 ओव्हरमध्ये 28 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या या जबरदस्त कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 83 रन्सवर ऑल आऊट झाला होता आणि भारताने तो सामना 59 रन्सनी जिंकला होता. गावस्कर यांनी ही कॅप त्यांच्यासाठी 'लकी' मानली आणि म्हणूनच ती आठवण त्यांनी संग्रहालयाच्या माध्यमातून सर्वांसाठी जपून ठेवली आहे.
मी भारावून गेलोय - सुनील गावस्कर
"या अनोख्या सन्मानाने मी भारावून गेलो आहे कारण मला खरोखरच शब्दच नाहीत. संग्रहालयाबाहेर एक पुतळा असतो जिथे इतके जास्त लोक येतील असे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही. मुंबईसाठी खेळण्याची संधी मिळणे हा एक विशेषाधिकार, सन्मान आणि आशीर्वाद आहे आणि मी कधीही स्वप्नातही पाहिले नव्हतं की हे असे होईल," गावस्कर यांनी माध्यमांना सांगितले.