यातील सर्वात खास बाब म्हणजे भारत आणि न्यूझीलंड हे क्रिकेट इतिहासातील असे पहिले संघ ठरणार आहेत, जे ICCच्या तीनही फॉरमॅटच्या (टेस्ट, वनडे आणि टी-20) स्पर्धांच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.
भारताने ग्रुप स्टेजमध्ये आपले चारही सामने जिंकले होते. मात्र सुपर-8 फेरीत त्यांना दक्षिण आफ्रिके विरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा 7 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली.
advertisement
दुसरीकडे न्यूझीलंड लीग स्टेजमध्ये आपल्या गटात दक्षिण आफ्रिकेनंतर दुसऱ्या स्थानावर राहिला. सुपर-8 मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर इंग्लंड विरुद्ध त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र श्रीलंके विरुद्धच्या मोठ्या विजयामुळे त्यांचा सेमीफायनलचा मार्ग सुकर झाला.
उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखले. त्यानंतर फक्त एक विकेट गमावत जवळपास आठ षटके बाकी असतानाच लक्ष्य गाठत अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाहिले तर भारताचे पारडे न्यूझीलंडवर जड राहिले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत.
एकूण टी-20 सामने: 30
भारत विजय: 18
न्यूझीलंड विजय: 11
टाय: 1
नो रिझल्ट: 0
टी-20 विश्वचषकातील चित्र वेगळे
मात्र ICC T20 World Cup मध्ये चित्र पूर्णपणे वेगळे आहे. या स्पर्धेत भारताला अजूनही न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडने तीनही वेळा भारताचा पराभव केला आहे. 2007 च्या स्पर्धेत न्यूझीलंडने भारतावर 10 धावांनी विजय मिळवला होता. 2016 च्या स्पर्धेतही कीवी संघाने भारताला 47 धावांनी हरवले. त्यानंतर 2021 च्या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला होता.
आयसीसी फायनलमध्ये चौथी भिडंत
ICCच्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांपैकी भारताने एक तर न्यूझीलंडने दोन सामने जिंकले आहेत.
15 ऑक्टोबर 2000 रोजी झालेल्या ICC KnockOut Trophy 2000 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतावर चार विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर 2021 मध्ये झालेल्या ICC World Test Championship Final 2021 मध्येही न्यूझीलंडने भारताला 8 विकेट्सने पराभूत केले. मात्र गेल्या वर्षी झालेल्या ICC Champions Trophy च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवत हिसाब चुकता केला होता.
आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडे इतिहास बदलण्याची मोठी संधी असेल, तर न्यूझीलंडचा संघ टी-20 विश्वचषकात भारताविरुद्धची आपली आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे 8 मार्चचा हा सुपर संडे क्रिकेट चाहत्यांसाठी एखाद्या मोठ्या युद्धापेक्षा कमी नसेल, अशीच चर्चा रंगली आहे.
