शंकरपूर (ता. गंगापूर) येथील शेतकरी कुटुंबातील प्रज्वल राजेंद्र पोळ यांनी वयाच्या 25 व्या वर्षी नागरी सेवा यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे. प्रज्वल यांनी यूपीएससी सीएसई-2025 परीक्षेत ऑल इंडिया रँक 434 मिळवली आहे. प्रज्वल यांची भारतीय महसूल सेवा (आयकर अधिकारी) पदावर निवड झाली आहे.
advertisement
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रज्वल यांनी कोणत्याही खासगी क्लासेसचा आधार न घेता हे यश मिळवले. स्वतःची जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. प्रज्वल यांनी यूपीएससी सीएसई या प्रतिष्ठित परीक्षेत यश मिळवल्यानंतर पोळ परिवाराकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत प्रज्वल यांना पुष्पहार घालून पेढे वाटण्यात आले.
प्रज्वल यांचे वडील राजेंद्र पोळ हे शेतकरी असून तेलासूर बाजारपेठेतील कृषी सेवा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यापारी म्हणून ओळखले जातात. अभ्यासाचे नियोजन त्यांनी दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन स्तरांवर केले. सर्वप्रथम यूपीएससीचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) समजून घेतले आणि त्यानुसार तयारी सुरू केली.
आठवड्याला आणि महिन्याला टार्गेट ठरवून अभ्यास केला. नियमित रिव्हिजन आणि उत्तर लेखन सरावावर त्यांनी विशेष भर दिला. काही विषयांसाठी मार्गदर्शन आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी क्लासेस घेतले होते. मात्र त्याचबरोबर स्व-अभ्यास, पुस्तके आणि PYQs यांवर अधिक भर दिला. मुलाखतीसाठी त्यांनी प्रामुख्याने मॉक इंटरव्ह्यू दिले. चालू घडामोडींचा अभ्यास केला आणि स्वतःची मते संतुलित आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्याचा सराव केला.





