Success Story : लग्नाला 18 वर्ष, 3 मुलं झाली मोठी; पण स्वप्न स्वस्थ बसू देईना; वयाच्या 40 व्या वर्षी 'ती' बनली अधिकारी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नोएडाच्या एका साध्या गावातून आलेल्या दीपा भाटी यांची गोष्ट ही केवळ एका यशाची कहाणी नाही, तर त्या लाखो महिलांसाठी आशेचा किरण आहे ज्यांना वाटतं की आता उशीर झाला आहे.
मुंबई : आपण अनेकदा ऐकतो की, एकदा लग्न झालं आणि मुलं झाली की स्त्रियांचं आयुष्य संसाराच्या चौकटीत बंदिस्त होतं. "आता काय वय आहे का शिकायचं?" किंवा "मुलांकडे लक्ष द्या, पुस्तकांकडे नाही," असे टोमणे अनेक महिलांना ऐकावे लागतात. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली अनेक स्वप्नं कायमची गाडली जातात. पण, जर मनाशी पक्कं ठरवलं आणि जिद्द उराशी बाळगली, तर वय आणि परिस्थिती फक्त आकडा ठरतात.
नोएडाच्या एका साध्या गावातून आलेल्या दीपा भाटी यांची गोष्ट ही केवळ एका यशाची कहाणी नाही, तर त्या लाखो महिलांसाठी आशेचा किरण आहे ज्यांना वाटतं की आता उशीर झाला आहे. 3 मुलांची आई, 18 वर्षांचा संसार आणि वयाची चाळीशी... हे सगळं सोबत असताना दीपा यांनी जे करून दाखवलं, ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
advertisement
दीपा भाटी या मूळच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथील कोंडली बांगर या छोट्याशा गावातील. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले. त्यांनी केमिस्ट्रीमध्ये पदवी आणि इतिहास विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचे स्वप्न मोठे होते, पण परिस्थितीने वेगळं वळण घेतलं आणि कमी वयातच त्यांचं लग्न झालं.
लग्नानंतर घरची जबाबदारी आणि पाठोपाठ तीन मुलांचे संगोपन यात दीपा यांचे आयुष्य गेलं. एक काळ असा आला की त्यांचा अभ्यासाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. संसाराच्या गाड्यात त्या इतक्या अडकल्या की स्वतःच्या स्वप्नांचा विसर पडतो की काय, असं वाटू लागलं होतं. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीही केली, पण काही कारणास्तव ती नोकरी सोडावी लागली.
advertisement
नोकरी सुटल्यानंतर काय करायचं, असा प्रश्न असताना त्यांच्या भावाने त्यांना 'सिव्हिल सर्व्हिस' (UPPCS) परीक्षेचा मार्ग दाखवला. वयाचं बंधन आणि घरचे काम यांमुळे हे अशक्य वाटत होतं, पण दीपा यांनी हे आव्हान स्वीकारलं. घरातली सगळी कामं करायची, तिन्ही मुलांचा अभ्यास आणि त्यांची देखभाल करायची आणि उरलेला वेळ स्वतःच्या अभ्यासाला द्यायचा, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला.
advertisement
चाळीशीत अभ्यास करताना पाहून आजूबाजूच्या लोकांनी अनेक टोमणे मारले. "आता काय साहेबीण होणार का?" अशा प्रश्नांनी त्यांना घेरलं होतं. पण दीपा यांचे लक्ष अर्जुनासारखे केवळ आपल्या ध्येयावर होते. 18 वर्षांच्या संसारानंतर आणि वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची (UPPCS) परीक्षा दिली.
2021 मध्ये जेव्हा निकाल लागला, तेव्हा संपूर्ण गाव थक्क झालं. दीपा भाटी यांनी 166 वी रँक मिळवून पीसीएस (PCS) अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. विशेष म्हणजे, ज्या वेळी त्या अधिकारी झाल्या, त्या वेळी त्यांची मोठी मुलगी स्वतः 12 वीत शिकत होती. आपल्या यशाने त्यांनी त्या सर्व लोकांना उत्तर दिले, ज्यांनी त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली होती.
advertisement
दीपा भाटी यांची ही सक्सेस स्टोरी सांगते की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतंही वय नसतं. तुमच्याकडे जर संयम आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर यश स्वतः रस्ता बनवून देतं. आज दीपा या त्या सर्व गृहिणींसाठी आदर्श आहेत, ज्या संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःची ओळख निर्माण करू इच्छितात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 9:13 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : लग्नाला 18 वर्ष, 3 मुलं झाली मोठी; पण स्वप्न स्वस्थ बसू देईना; वयाच्या 40 व्या वर्षी 'ती' बनली अधिकारी








