अबब! मक्याच्या एका ताटाला चक्क लागली 8 कणीसे, शेतकऱ्याच्या प्रयोगाची गावात चर्चा Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या मक्याच्या प्रत्येक ताटाला तब्बल आठ कणीसे लागल्याने परिसरात या प्रयोगाची चर्चा रंगली आहे.
सोलापूर : शेतीमध्ये योग्य नियोजन आणि प्रयोगशीलता असेल तर निसर्गही साथ देतो, याचे उत्तम उदाहरण मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील शेतकरी मोतीराम धोडमिसे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या मक्याच्या प्रत्येक ताटाला तब्बल आठ कणीसे लागल्याने परिसरात या प्रयोगाची चर्चा रंगली आहे.
मोतीराम धोडमिसे यांनी आपल्या एक एकर उसाच्या शेतीत आंतरपीक म्हणून मका घेतला. उसाच्या दोन फडांमध्ये सुमारे दोन फूट अंतर ठेवून टोकन पद्धतीने मक्याची लागवड करण्यात आली. लागवडीदरम्यान त्यांनी प्रत्येक ठिकाणी दोन बियाणे टोकन करून पेरले. या पद्धतीमुळे एका ताटाला जास्त फुटवे तयार झाले आणि परिणामी एका ताटाला तब्बल आठ कणीसे लागलेली दिसून येत आहेत.
advertisement
मक्याच्या चांगल्या वाढीसाठी त्यांनी 10-20 खत तसेच युरियाचा चार ते पाच पोत्यांचा डोस दिला. मक्यावर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणीही करण्यात आली. सामान्यतः मक्याच्या एका ताटाला तीन ते चार कणीसे लागतात; मात्र धोडमिसे यांच्या शेतात आठ कणीसे लागल्याने हा प्रयोग विशेष ठरला आहे.
advertisement
धोडमिसे यांनी सुरुवातीला जनावरांना चारा मिळावा या उद्देशाने उसामध्ये मका आंतरपीक म्हणून घेतला होता. मात्र पिकाची वाढ उत्तम झाल्याने या एक एकर क्षेत्रातून सुमारे 25 ते 30 क्विंटल मक्याचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. यातून खर्च वजा जाता जवळपास 80 हजार रुपयांचा नफा मिळणार आहे.
याशिवाय उसाच्या एक एकर लागवडीतून सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपयांचा नफा अपेक्षित आहे. म्हणजेच उसात मका आंतरपीक घेतल्यामुळे धोडमिसे यांना एकूण जवळपास तीन लाख रुपयांचा फायदा होणार आहे. योग्य नियोजन आणि आंतरपिकांच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करता येते, असा सल्लाही त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 7:29 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
अबब! मक्याच्या एका ताटाला चक्क लागली 8 कणीसे, शेतकऱ्याच्या प्रयोगाची गावात चर्चा Video




