पाकिस्तानमधील वृत्तसंस्था असलेल्या जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सगळे पर्याय खुले ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात सहभागी होण्यास नकार देणे, हा एक पर्याय असला तरी दुसरा पर्याय म्हणजे स्पर्धेतून पूर्णपणे माघार घेणे, असा असू शकतो.
पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात खेळायला नकार दिला तर भारताला या सामन्याचे दोन पॉईंट्स दिले जातील. पाकिस्तानने स्पर्धेवर बहिष्कार टाकला तर त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, तसंच त्यांना आयसीसीच्या कारवाईलाही सामोरं जावं लागू शकतं.
advertisement
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर बांगलादेशने आयसीसीला त्यांचे सामने श्रीलंकेमध्ये ठेवण्याची विनंती केली होती. आयसीसीसोबत दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर सर्व देशाच्या बोर्डांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला, ज्यात बांगलादेशच्या बाजूने फक्त 2 आणि विरोधात 14 मतं पडली, त्यामुळे बांगलादेशची विनंती मान्य केली गेली नाही. आयसीसीच्या या निर्णयामुळे बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि आता बांगलादेशऐवजी स्कॉटलंडची टीम टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे.
पाकिस्तानचा निषेध का?
बांगलादेशची विनंती मान्य न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच आयसीसीचा निषेध नोंदवला आहे. आयसीसीची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी केला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायचं का नाही, याचा निर्णय पंतप्रधानांसोबत सल्लामसलत केल्यानंतर घेतला जाईल, असंही मोहसीन नक्वी यांनी स्पष्ट केलं आहे.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार झाला होता, जिथे दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे 2027 पर्यंत दोन्ही टीम आयसीसी स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी खेळतील, असा निर्णय घेतला गेला होता.
