फिन ऍलन आणि टीम सायफर्ट या न्यूझीलंडच्या दोन ओपनरनी 9.1 ओव्हरमध्येच 117 रनची पार्टनरशीप केली. सायफर्टने 33 बॉलमध्ये 175.76 च्या स्ट्राईक रेटने 58 रन केले, यात त्याने 7 फोर आणि 2 सिक्स मारल्या.
कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर किवी टीमने दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 169/8 वर रोखलं. टी-20 क्रिकेटच्या हिशोबाने हा स्कोअर कमी असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडला सुरूवातीलाच धक्के द्यायचं आव्हान होतं, पण यात त्यांना यश आलं नाही.
advertisement
दक्षिण आफ्रिकेची खराब फिल्डिंगही त्यांच्या या पराभवाच्या कारणांपैकी एक ठरली. दक्षिण आफ्रिकेची बॉलिंग सुरू झाल्यानंतर आठव्याच बॉलला त्यांनी फिल्डिंगमध्ये चूक केली. कागिसो रबाडाच्या बॉलिंगवर टीम सायफर्टने हवेमध्ये बॉल मारला, पण विकेट कीपर क्विंटन डिकॉक आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात गोंधळ झाला आणि सायफर्टचा कॅच कोणाच्याच हातात आला नाही.
या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजच्या सर्व 4 आणि सुपर-8 मधल्या सगळ्या 3 अशा एकूण 7 मॅच जिंकल्या होत्या. लागोपाठ 7 विजयांसह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक मारली होती, पण सेमी फायनलमध्येच दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का बसला आणि त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेला 169 रनवर रोखलं. मॅट हेन्री, रचिन रवींद्र आणि कोले मॅककोनचिए यांना 2-2 आणि लॉकी फर्ग्युसन, जिमी नीशम यांना 1-1-1 विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मार्को यानसनने 30 बॉलमध्ये नाबाद 55 रनची खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविसने 34 आणि ट्रिस्टन स्टब्जने 29 रन केले.
दुसरीकडे न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवार 5 मार्चला दुसरी सेमी फायनल होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारी टीम 8 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
