ती हरली नाही लढली
महापालिकेच्या आयुक्तांच्या कार चालकाची मुलगी गायत्री घोडे हिने पहिल्याच प्रयत्नात केवळ तीन गुणांनी अपयश आल्यानंतरही हार मानली नाही. तिने आत्मविश्वासाने आणि दुप्पट मेहनतीने पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं खडतर आव्हान जिद्दीनं पेललं आणि ते पूर्णही करुन दाखवलं. एका सरकारी वाहनचालकाच्या मुलीनं मिळवलेलं हे घवघवीत यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद आहे.
advertisement
अवघ्या 3 गुणांनी पहिल्या प्रयत्नात हुकले यश
भिवंडीतील कोनगाव भागात राहणाऱ्या चंद्रशेखर घोडे यांची ही कन्या. शासकीय सेवेत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या वडिलांचे स्वप्न आपल्या मुलीने पूर्ण करावे अशी त्यांची इच्छा होती. गायत्रीनेही शाळेपासूनच सीए बनण्याचे ध्येय होतं. रात्रीचा दिवस करून तिने आपला पहिला प्रयत्न केला, मात्र 3 मार्कांच्या फरकाने तिला पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. थोडं वाईट वाटलं पण ती खचली नाही पुन्हा उभी राहिली. न डगमगता तिने पुन्हा दुसरा प्रयत्न केला आणि यशस्वी होऊनच दाखवलं.
दुप्पट मेहनत, रात्रीचा दिवस अभ्यास
पहिल्या प्रयत्नातील चुका लक्षात घेऊन गायत्रीने दुसऱ्यांदा अधिक चांगलं नियोजन करुन अभ्यास केला. तिने दररोज किमान चार तासांपेक्षा अधिक वेळ अभ्यासासाठी दिला. अनेकदा तिने अभ्यासासाठी रात्रीचा दिवस केला, अर्धरात्रीपर्यंत जागत मेहनत घेतली. जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या बळावर तिने मे महिन्यामध्ये पुन्हा सीएची परीक्षा दिली आणि या वेळेस तिने यश खेचून आणलं.
सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गायत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला. CA व्हायचं हे लहानपणीच तिचं पक्क ठरलं होतं. आयुक्तांकडून विशेष सत्कार आणि अभिनंदन करण्यात आलं. गायत्रीच्या या प्रेरणादायी यशामुळे महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी महापालिकेमध्ये गायत्रीचा सत्कार समारंभ आयोजित केला आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत बक्षीस देऊन तिचा गौरव केला. यावेळी तिचे आई वडील उपस्थित होते.
