आंब्याच्या लोणच्याची गोष्ट
अनेक दशकांपासून आपण पाहतो की, आंबा सिझन आला की प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात महिला मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात आंब्याचे लोणचे बनवतात. पण हे लोणचे फक्त कुटुंबासाठीच वापरले जाते. याच 'घरगुती' लोणच्याला व्यवसायात बदलून महाराष्ट्रातील रेखा प्रभाकर चव्हाण यांनी तब्बल ४० लाख रुपयांची मोठी उलाढाल असलेला ब्रँड यशस्वीरित्या उभा केला आहे. रेखा यांना नेहमीच काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्या आणि त्यांच्या मैत्रिणी मिळून नेहमीच चर्चा करत असत की, एखादा व्यवसाय सुरू करायचा, पण नेमकी सुरुवात कुठून करावी, कोणता व्यवसाय निवडायचा, याची त्यांना काहीच कल्पना येत नव्हती.
advertisement
व्यवसाय करण्याची आयडिया कशी सुचली
या व्यवसायाची खरी प्रेरणा आणि सुरुवात अत्यंत साधी आणि सहज होती. रेखा प्रभाकर यांच्या आई नेहमीच घरी मोठ्या संख्येने आंब्याचे लोणचे तयार करत असत. एक दिवस रेखा यांनी आईच्या हातचे ते खास लोणचे आपल्या डब्यात सोबत नेले. जेव्हा त्यांनी आपल्या मैत्रिणींसोबत डबा उघडला आणि जेवण सुरू केले, तेव्हा सर्वांना लोणचं खूप आवडलं. मैत्रिणींनी लगेच 'हे लोणचे आम्हाला कसं मिळेल, आम्हालाही हवंय,' असं म्हटलं. मग काय तिथेच आयडिया सुचली आणि व्यवसायाची सुरुवात झाली.
गंमत-जंमत म्हणून लोणच्याचा व्यवसाय सुरू करण्याची चर्चा झाली आणि पाहता पाहता त्याचा एक यशस्वी ब्रॅण्डही तयार झाला. हा व्यवसाय त्यांच्या आईमुळेच सुरू होऊ शकला, म्हणून त्यांनी आपल्या आईच्या हाताची ही पारंपारिक रेसिपी जपली आहे. या लोणच्याची निर्मिती करताना आंब्यांचा व्यवस्थित फोडी करुन घेणे, त्यांना उन्हात वाळवणे, घरात स्पेशल मसाले तयार करुन ते लोणच्यासाठी वापरणं यामुळे हे लोणचं अधिक लोकप्रिय झालं.
आईचं लोणचं का नाव दिलं, नावामागची कहाणी
या लोणच्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे, कमी तेलात ते केलं जातं. त्यामुळे त्याची चव लहानपणीच्या शुद्ध आंब्याच्या लोणच्याची आठवण करून देते. आईच्या कष्टाला आणि प्रेमाला सलाम करण्यासाठी त्यांनी आपल्या ब्रँडच्या कव्हर पेज आणि डब्याच्या मुखपृष्ठावर आईचा फोटो लावला. ब्रँडला 'आई लोणचे' असं थोडं भावनिक नाव दिलं. आकर्षक नाव आणि अप्रतिम चव यामुळे कमी कालावधीमध्ये लोणचं प्रसिद्ध झालं. या लोणच्याची किंमत ३५० रुपये ठेवण्यात आली.
लोणचं विकून होणारा नफा
रेखा प्रभाकर यांनी त्यांचा 'आई लोणचे' हा ब्रँड ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने संपूर्ण देशभरात यशस्वीरीत्या पोहोचवण्यावर भर दिला. या कामात त्यांचे पती त्यांना पूर्ण सहकार्य करतात. देशभरातून लोणच्याला मिळत असलेल्या मोठ्या मागणीमुळे आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सर्व खर्च आणि व्यवस्थापनाचा खर्च वजा केल्यास, त्यांच्या हातात 13 लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. या यशातून त्यांनी आणखी 10 महिलांना आपल्या हाताखाली काम करण्याची संधी दिली आहे, ज्यामुळे त्यांनाही रोजगार मिळाला आहे.
आपल्या 'आई लोणचे' या ब्रँडला आता देश-विदेशात पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. परदेशातूनही त्यांच्या लोणच्याला चांगली मागणी येत आहे. विशेष म्हणजे, त्या एकीकडे हा यशस्वी व्यवसाय सांभाळत असतानाच दुसरीकडे स्वतःचा अभ्यास आणि शिक्षणही पूर्ण करत आहेत. रेखा प्रभाकर चव्हाण यांनी हे सिद्ध केले आहे की, जर घरगुती पदार्थांना गुणवत्ता, भावनिक जोड आणि योग्य मार्केटिंगची जोड मिळाली, तर कोणताही पदार्थ कोट्यवधींची क्षमता असलेला ब्रँड बनू शकतो आणि ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.