घरातलं दारिद्र्य, संघर्ष आता संपणार आहे. घरात दारिद्र्य आणि संकटाची मालिका एकामागे सुरूच होती, त्याच घरात आज एकाच वेळी दोन क्लास वन अधिकारी झाले आहेत. अकोल्याच्या राजेंद्र घुगे यांनी राज्यात १२ वा तर, प्रतीक पारवेकर यांनी चौथा क्रमांक मिळवत एमपीएससीच्या राज्य सेवा परीक्षेत मिळवलेले हे यश केवळ आकड्यांचे नाही, तर अनेक वर्षांच्या त्यागाची आणि जिद्दीची ही प्रेरणा आणि यशोगाथा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.
advertisement
अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला अधिकारी
प्रतीक पारवेकर अवघ्या चार वर्षांचे होते, तेव्हा वडिलांचं छत्र हरपलं. आई मालती पारवेकर आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावत होती. आईनं अंगणवाडी सेविका म्हणून काम करत मुलाच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य पणाला लावले. घरात गरिबी, आईचा संघर्ष पाहत प्रतीकने पहिल्याच प्रयत्नात क्लास-वन अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले. दुसरीकडे, मामा राजेंद्र घुगे यांची कहाणीही वेगळी नव्हती; ते सहा महिन्यांचे असतानाच त्यांचे वडील वारले. या दोघांच्या संघर्षात कुटुंबातील हेमंत घुगे यांची प्रेरणा आणि पाठीचा भक्कम आधार होता, ज्यामुळे हे दुःख पचवून त्यांनी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं.
मामा भाच्याने पाहिलं एक स्वप्न
पुण्यात अभ्यासासाठी एकत्र गेलेल्या या मामा-भाच्याचा संघर्ष डोळ्यांत पाणी आणणारा आहे. आर्थिक अडचणी इतक्या होत्या की, त्यांच्याकडे जेवणासाठीही पुरेसे पैसे नव्हते. दोघांमध्ये एक डबा मागवून जेमतेम भागवायचे. मुलाखतीसाठी लागणारा महागडा टाय-सूट घेण्याची ऐपत नव्हती, म्हणून तोही त्यांनी एकमेकांमध्ये वापरला. अभ्यासाच्या खोल्यांमध्ये त्यांनी कितीतरी रात्री जागून काढल्या असतील. त्यांचे ध्येय स्पष्ट होते. या गरिबीच्या चक्रातून बाहेर पडायचे. त्यांच्या डोळ्यांत स्वप्न एकच होते. सरकारी अधिकारी होऊन आपल्या आई-मामाच्या त्यागाचे सार्थक करायचे.
आईचा त्याग आणि मामाचे मार्गदर्शन
प्रतीक पारवेकर यांना अक्षरश: रडू कोसळलं. आज क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली. माझ्या आयुष्यातील हा क्षण माझ्या आईच्या त्यागाचा आणि मामाच्या मार्गदर्शनाचा सर्वात मोठा अभिमान आहे. त्यांच्या विश्वासानेच हे शक्य झाले. तर राजेंद्र घुगे यांनी आपल्या बहिणीला श्रेय दिलं. माझी बहीण आणि भाचा यांच्या साथीनं हे यश मिळालं. आता खरी सेवा सुरू होणार आहे. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणं, हाच पुढचा संकल्प आहे.
