प्रिलिम्स हुकली आणि आयुष्याला कलाटणी
रवीना यांचं बॅकग्राऊंड बीटेक फूड टेक्नॉलॉजीचे होते. २०२२-२३ मध्ये फूड सेफ्टी ऑफिसर (FSO) च्या जागा येणार असल्याने ती टेक्निकल परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत होत्या. राज्यसेवेची प्रिलिम्स परीक्षा दिली होती, पण त्यांचा पूर्ण फोकस FSO वर होता. त्याच वेळी पीएसआयच्या प्रिलिम्सचा निकाल आला. लायब्ररीतील मैत्रिणीने त्यांचं नाव पाहिले आणि विचारले, "तुझं तर पीएसआयच्या प्रिलिम्समध्ये झालंय, मेन्स देणार आहेस का?" रवीनाने साफ नकार दिला. "मी फक्त FSO वर फोकस करत आहे," असं त्यांचं उत्तर होते. मात्र, आठवड्याभरात राज्यसेवेचा निकाल लागला. रवीना यांना ८६ गुण मिळाले आणि कट ऑफ होता ८७.५ गुणांवर! थोडक्यासाठी FSO ची प्रिलिम्स हुकली. रवीनाच्या हातातील टेक्निकल परीक्षेची संधी गेली होती.
advertisement
रडण्याचा एक दिवस, अभ्यासाचे दीड महिने
हातातून FSO हुकल्यानंतर रवीना यांच्याकडे पीएसआयच्या मेन्स परीक्षेसाठी फक्त दीड महिना शिल्लक होता. १५ सप्टेंबरला PSI च्या मेन्स फॉर्मची लिंक सुरू झाली आणि परीक्षा होती ५ नोव्हेंबरला. "खूप कमी वेळ आहे, कसं करणार आहेस?" मैत्रिणीच्या या प्रश्नाने रवीनाला वास्तवाची जाणीव झाली. "असं होतं की कधीकधी परिस्थिती आपल्याला रडायला पण वेळ देत नाही," रवीना म्हणाल्या.
त्या दिवशी रवीना यांनी आपली टेक्निकलची पुस्तके बॅगेत भरली, रूमवर जाऊन ढसाढसा रडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून त्यांनी बॅग भरली, त्यात पीएसआयची पुस्तके घेतली आणि थेट लायब्ररी गाठली. या दीड महिन्यात तिने दररोज सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत जीव तोडून अभ्यास केला.
पाय मोडले तरी चालेल, पण ग्राउंड क्लिअर करून येणार!
मेन्स क्लिअर झाल्यावर खरी कसोटी होती 'ग्राउंड टेस्ट'ची. रवीना यांना कुणाचाही गाईडन्स नव्हता. त्यांनी एकटीने सराव सुरू केला आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. डॉक्टरांनी एक महिना बेड रेस्ट सांगितली. "घरच्यांनी सांगितलं, आता तू ग्राउंड करू नकोस," पण त्या थांबल्या नाहीतर त्यांनी पुन्हा सराव सुरू केला तेव्हा पहिल्यांदा ३० मार्क, नंतर ६१ मार्क मिळाले, पण तिसऱ्यांदा पुन्हा पायाला दुखापत झाली. चौथ्यांदाही वेदना वाढल्या.
यावेळी मात्र तिची जिद्द तुटली नाही. रवीना यांनी निश्चय केला, "पाय मोडले तरी चालेल, पण ग्राउंड क्लिअर करून येणार!" ग्राउंड परीक्षेआधी आईला फोन केला, टेन्शन आल्याचं सांगितलं. आईने मोठा धीर दिला. तू इथंवर पोहोचलीस तेच आमच्यासाठी खूप आहे. तू ग्राउंड क्लिअर झाली नाहीत तरी ताठ मानेन पुन्हा घरी ये, चिंता करू नको. देव सारं काही पाहातो आहे. तुझ्या कष्टाचं नक्की चिज होईल. आईचे शब्द कानावर आले आणि तिने हिम्मत दिली. ग्राउंड टेस्ट क्लिअर झाल्यावर तिने पहिला फोन घरी वडिलांना केला.
गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
पारगाव तर्फे आळे येथील एका शेतकरी कुटुंबातील रवीना बाळासाहेब डुकरे हिने आपल्या अभूतपूर्व जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. येथील महात्मा गांधी विद्यालयात १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या रवीनाची निवड गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद ठरली. तिच्या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने तिची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि महात्मा गांधी विद्यालयात तिचा जाहीर सत्कार करण्यात आला. रवीनाची ही संघर्षगाथा, 'हार न मानण्याची जिद्द' घेऊन आलेल्या प्रत्येकासाठी एक नवा आदर्श आहे.
