पाचवीपर्यंत शिक्षण आणि ८०० रुपयांची पहिली नोकरी
आकाश रोडे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील निलंगा या छोट्या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. ते सात भावंडं असल्यामुळे आणि घरी जमीन कमी असल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. यामुळे त्यांना केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेता आले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी काम करायचे ठरवले. त्यांनी एका दुकानात नोकर म्हणून काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांचा पगार फक्त ८०० रुपये प्रति महिना होता. शून्यातून सुरुवात करताना त्यांनी तिथे टेबल-खुर्च्यांपासून ते मालकाचे बूट देखील स्वच्छ केले. याच काळात त्यांनी मोठे स्वप्न पाहिले आणि आयुष्यात काहीतरी मोठे करायचे, हे निश्चित केले.
advertisement
कर्ज आणि फसवणुकीचे दोन मोठे धक्के
जोश टॉकमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये आपला अनुभव सांगताना डोळे पाणावले. मोठे काही करण्याच्या ध्येयाने त्यांनी कर्ज घेतलं आणि आईचे दागिने विकून मोबाईलचे छोटं दुकान सुरू केलं. पण अपुऱ्या बजेटमुळे त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागला. कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने त्यांना नाईलाजाने परत एकदा त्याच जुन्या मालकाकडे जाऊन, कर्ज फेडण्यासाठी आणि पुन्हा काम मिळवण्यासाठी विनंती करावी लागली. दोन-तीन वर्षे मेहनत करून त्यांनी पहिल्यांदा कर्ज फेडलं आणि आईचे दागिनेही परत केले. त्यानंतर कपड्यांचे दुकान सुरू करून त्यांनी जम बसवला. मात्र, २०२० मध्ये आलेल्या कोविड महामारीमुळे त्यांचे एक कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर आले आणि व्यवसाय पूर्णपणे बंद पडला.
कर्जदारांच्या भीतीमुळे घर सोडले
कर्जदार घरी येऊन दरवाजा ठोठावत होते आणि पैसे मागत होते. जीव वाचवण्यासाठी आणि मारहाण टाळण्यासाठी आईच्या सांगण्यावरून त्यांनी रात्रीतून घर सोडले. खिशात एक रुपयाही नसताना ते २० किलोमीटर चालत गेले आणि नंतर ट्रक ड्रायव्हरला विनंती करून पुण्यात पोहोचले. पुण्यात आल्यावर त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. स्टेशनवर उपाशी बसलेल्या आकाश यांना एका वडापाववाल्या मावशीने जेवण दिले. तो एक वडापाव खाऊन ते पाच तास काय करावे याचा विचार करत बसले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यांना काम मिळाले. तिथे त्यांनी वेटर आणि भांडी धुण्याचे काम केले, कारण त्यांना राहण्याची आणि खाण्याची सोय हवी होती.
बिना शेफच्या मॉडेलची संकल्पना आणि कंपनीची निर्मिती
हॉटेलमध्ये काम करत असताना, त्यांनी शेफकडून २०० रुपये मासिक फी देऊन स्वयंपाक शिकून घेतला. शेफ आजारी पडल्यावर आकाश यांनी मालकाला स्वयंपाक करून दाखवला आणि लगेच त्यांना ८,००० रुपयांच्या पगारावर शेफची नोकरी मिळाली. तेथे मालकाला येणाऱ्या 'शेफची समस्या' त्यांनी ओळखली आणि यावर तोडगा म्हणून 'शेफ-लेस' मॉडेलची संकल्पना मांडली. त्यांनी प्रत्येक पदार्थाचे एसओपी आणि रेडी-मिक्स तयार केले, ज्यामुळे कोणीही माणूस सारख्या चवीचा पदार्थ बनवू शकेल. मालकाच्या मदतीने त्यांनी याच मॉडेलवर पहिला कॅफे सुरू केला.
हळूहळू या कॅफेचे रूपांतर ९९ टेस्टी हब या ब्रँडमध्ये झाले आणि फ्रँचायझी मॉडेलच्या माध्यमातून आज त्यांचे देशभरात १५० हून अधिक आऊटलेट्स आहेत. आज त्यांची कंपनी १५० कोटींहून अधिक व्हॅल्युएशन असलेली आणि वार्षिक ५० कोटींची उलाढाल करणारी बनली आहे. रोडे यांनी तरुणांना संदेश दिला की, "गरीब घरात जन्माला येणे ही कोणतीही वाईट गोष्ट नाही. प्रत्येक गरीब घरात जन्मलेला माणूसही मोठ्या स्तरावर पोहोचू शकतो." त्यांनी स्वतःच्या कठोर परिश्रमाने आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने हे सिद्ध केले आहे.
