कुडाळ नगरपंचायतीच्या फुटपाथवर बसून उन्हातान्हात हार-फुलं विकणाऱ्या एका कष्टकरी आईच्या आयुष्याचं सोनं झालं. कुडाळच्या पिंगुळी शेटकरवाडीतील गोपाळ सावंत या तरुणाची CRPF मध्ये देशसेवेसाठी निवड झाली आहे. आपल्या निवडीची ही आनंदाची बातमी गोपाळने जेव्हा फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या आईला जाऊन दिली, तेव्हा त्या माय-लेकाच्या भेटीचा व्हिडीओ पाहून अख्खा सिंधुदुर्ग भावुक झाला आहे.
advertisement
आईच्या संघर्षाला मुलाची सलामी
गोपाळची आई गेल्या अनेक वर्षांपासून कुडाळमध्ये रस्त्याच्या कडेला बसून हार-फुलं विकण्याचे काम करते. अत्यंत गरिबीत आणि कष्टाच्या परिस्थितीत तिने आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं आणि शिकवलं. आपल्या आईने आपल्यासाठी केलेले कष्ट गोपाळने जवळून पाहिले होते. म्हणूनच, 'काहीही करून आईचे पांग फेडायचे आणि देशाची सेवा करायची' हे स्वप्न उराशी बाळगून त्याने सैन्य भरतीसाठी मेहनत घेतली होती.
तो क्षण आणि माऊलीची माया...
आज जेव्हा गोपाळ सीआरपीएफची वर्दी घालून, डॅशिंग रुबाबात थेट आईच्या व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा क्षणभर आईलाही विश्वास बसला नाही. आपल्या काळजाचा तुकडा आज देशाचा रक्षक झाला आहे, हे पाहताच त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गोपाळने आईच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. भररस्त्यात घडलेला हा माय-लेकाचा सोहळा पाहून आजूबाजूचे व्यापारी आणि पादचारीही थांबले आणि त्यांनी गोपाळचे कौतुक केले.
पिंगुळी गावाचा अभिमान
गोपाळ सावंत याच्या या यशाने केवळ शेटकरवाडीतच नव्हे, तर संपूर्ण पिंगुळी गावात आनंदाचे वातावरण आहे. "आईने रस्त्यावर बसून कष्ट केले, पण मुलाने आज त्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गोपाळची ही जिद्द आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
