मुरबाड तालुक्यातील आसोळे या एका छोट्याशा गावातून मुलगी आज थेट पुणे मेट्रोच्या केबिनमध्ये बसून हजारो चाकरमान्यांना त्यांच्या कामाच्या गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षित पोहोचवत आहे. ही कहाणी आहे प्रगती दीपक कोर यांची. प्रगती केवळ मेट्रो चालवत नाहीत, तर त्या त्यांच्यासारख्या हजारो मुलींना मोठी स्वप्नं पाहण्याची नवी दिशा देत आहेत. पुण्यात त्यांची मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती झाली आहे.
advertisement
प्रगती यांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे आत्मविश्वास, संघर्ष आणि निर्धाराची एक जिवंत कहाणी आहे. आज त्या पुणे मेट्रोमध्ये वरिष्ठ लोको पायलट म्हणून कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे, त्या पुरुष सहकाऱ्यांसोबतच १०० हून अधिक महिला पायलट असलेल्यांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत. मुरबाडसारख्या ग्रामीण भागातून येऊन मेट्रो लोको पायलट बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
शिक्षणात अडचणी पण कौशल्यानं सांभाळली जबाबदारी
२७ वर्षांच्या प्रगती कोर यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण मुरबाडमध्ये झालं. दहावीत चांगले गुण मिळवल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. मुंबईतील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला आणि नंतर ए.सी.पी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. मोठी बहीण शिकत असल्याने, घरात आर्थिक चणचण होती. शहरात राहण्याची सोय, शिक्षण आणि घर चालवण्यासाठी पार्ट-टाईम काम करण्याची कसरत त्यांनी कौशल्याने सांभाळली. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत डिझाईन इंजिनिअर म्हणूनही काही काळ काम केले. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी समाधानाचा ठरला आहे.
मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट म्हणून रुजू
प्रगती यांनी २०२० साली शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, ५ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्या अधिकृतपणे मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट म्हणून रुजू झाल्या. कठोर परिश्रम, तांत्रिक कौशल्ये आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी मेट्रो पायलटच्या लेखी परीक्षा आणि मुलाखती यशस्वीपणे पार केल्या. आज त्या पुणे मेट्रोमध्ये रुजू होऊन हजारो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी सांभाळत आहेत. सुरुवातीला त्यांनी मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर मेट्रो चालवली. पण आता त्या पुणे मेट्रोमध्ये नव्या महिला पिढीला मार्गदर्शन करत आहेत.
प्रगती म्हणते...
प्रगती सांगतात की, त्यांच्या कुटुंबात दूरदूरपर्यंत कोणीही या क्षेत्रात नाही. त्यामुळे जेव्हा त्या पहिल्यांदा मेट्रोच्या नियंत्रण कक्षात बसतात, तेव्हा त्यांना अखंड आणि अनोखा अभिमान वाटतो. आई-वडीलही त्यांच्या या यशाने आनंदात गदगद झाले आहेत. एका छोट्या गावातून आलेल्या मुलीने आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रवाशांच्या स्वप्नांना आणि स्वतःच्या भविष्याला कशी दिशा दिली आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रगती कोर आहेत. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणींसाठी प्रेरणा आहे.
