धाकटा भाऊ नागनाथ संजय मंगनाळे याने वयाच्या सहाव्या वर्षीच वडिलांना गमावलं, तर चौदाव्या वर्षी आईचेही छत्र हरपलं. एकामागोमाग एक आलेल्या या आघातांमुळे आयुष्य कोलमडलं. मात्र परिस्थितीसमोर झुकायचे नाही, ही जिद्द त्याने लहानपणापासून उराशी बाळगली. फुलवळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतून शिक्षणाची सुरुवात, श्री बसवेश्वर विद्यालयातून माध्यमिक शिक्षण आणि श्री शिवाजी कॉलेज कंधार येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत त्याने अभ्यासाचा ध्यास कधीही सोडला नाही.
advertisement
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी नागनाथने भारतीय हवाई दलात आपले स्थान निश्चित केले. येत्या २७ डिसेंबर २०२५ रोजी तो बेळगाव येथे कर्तव्यावर रुजू होणार आहे. नांदेडच्या फुलवळ गावातून भारतीय हवाई दलात दाखल होणारा तो पहिला भूमिपुत्र ठरला. त्याचा मोठा भाऊ साईनाथ हा इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आहे. दोन्ही भावांच्या मेहनतीचं चीज झालं. आई-वडील गेल्यानंतर दोन्ही भावंडांना आपल्या घरी घेऊन त्यांचा सांभाळ करणारे मामा तुकाराम नामदेव मुदखेडे यांचा या सगळ्यात सिंहाचा वाटा आहे. या दोघांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मामाने उचलली, भविष्यासाठीची जबाबदारी खांद्यावर घेतली.
थोरला भाऊ साईनाथ मंगनाळे यानेही वयाच्या १९व्या वर्षी भारतीय नौदलात दाखल झाला. एक भाऊ नौदलात, दुसरा हवाई दलात, अशी दुर्मीळ कामगिरी करत मंगनाळे भावंडांनी आपल्या गावाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केलं. याच गावातील कृष्णा अशोकराव पाटील यांचीही भारतीय हवाई दलात निवड झाली असून, त्यांच्या यशामुळे फुलवळ आणि परिसरात अभिमानाचे वातावरण आहे. या तिन्ही तरुणांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. गावातील तरुणांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना नागनाथ म्हणतो, मामाची साथ, मोठ्या भावाचे मार्गदर्शन आणि शिक्षकांनी दिलेला आत्मविश्वास यामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो. ही प्रेरणा माझ्यासाठी अमूल्य आहे आणि त्याच ताकदीवर मी देशाची सेवा प्रामाणिकपणे करणार आहे.”
