सुरुवातीचा काळ अतिशय कठीण होता. शोभना यांनी बनवलेल्या सुरुवातीच्या व्हिडिओंना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, पण त्या खचल्या नाहीत. एक दिवस त्यांच्या गावात वीज नव्हती. अशा अंधारात त्यांनी मेणबत्ती पेटवली आणि त्या उजेडात जेवण तयार करतानाचा एक साधासा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि बघता बघता तो तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये झगमगाट नव्हता, तर शोभना यांची गरिबीतील 'सत्य परिस्थिती' होती. लोकांनी त्यांची ही प्रामाणिक जिद्द पाहिली आणि त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. आज हीच मेणबत्ती त्यांच्या आयुष्यात यशाचा प्रकाश घेऊन आली आहे.
advertisement
शोभना यांचा हा प्रवास तांत्रिक अडचणींनी भरलेला होता. आजही त्यांच्या भागात मोबाईलला रेंज नसते. एखादा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी त्यांना चक्क २ किलोमीटर लांब पायपीट करत जावे लागते. घरात वीज नसेल तर मेणबत्तीच्या उजेडात काम करावे लागते. पण जिद्द असेल तर रस्ता आपोआप सापडतो. त्या स्वतः व्हिडीओ शूट करतात आणि त्यांचे पती त्यांना एडिटिंगमध्ये मदत करतात. पती-पत्नीच्या या जोडीने मिळून कष्टाने हा मार्ग निवडला आहे. जेवण बनवण्यापासून ते व्हिडीओ अपलोड करण्यापर्यंतची त्यांची धडपड पाहून आज लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.
कोणतेही नवीन काम सुरू केले की समाज पाय खेचायला तयारच असतो, शोभना यांच्या बाबतीतही तेच घडले. जेव्हा त्यांनी व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना हे काम मुळीच आवडले नाही. लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली, हेटाळणी केली. पण शोभना यांनी लोकांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांनी आपला पूर्ण वेळ आणि लक्ष आपल्या कामावर केंद्रित केले. आज त्याच कामाच्या जोरावर त्या महिन्याला २० ते ३० हजार रुपये कमावत आहेत. शेतीतून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नाला आता त्यांच्या या कष्टाची मोठी साथ मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे जीवन सुसह्य झाले आहे.
शोभना यांची ही कहाणी केवळ पैसे कमावण्यापुरती मर्यादित नाही, तर ती एक मोठी प्रेरणा आहे. एका साध्या गृहिणीने तंत्रज्ञानाच्या जोरावर स्वतःची ओळख कशी निर्माण करावी, हे त्यांनी जगाला दाखवून दिले आहे. "माझी खरी परिस्थिती लोकांनी पाहिली आणि त्यांना ती भावली," असे त्या अभिमानाने सांगतात. परिस्थितीशी दोन हात करत, लोकांशी टोमणे सहन करत त्यांनी जो मार्ग निवडला, त्यावर त्या आज आत्मविश्वासाने चालत आहेत. संकटांवर मात करून यशाचे शिखर कसे गाठता येते, याचे शोभना हे एक जिवंत उदाहरण ठरल्या आहेत.
