बीड जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी स्वाती ठोंगे यांच्या बाबतीतही असेच घडलं. केवळ ५ रुपयांसाठी झालेल्या अपमानाने स्वाती यांच्या मनातील ठिणगी पेटवली. जोश टॉक्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांना व्यवसाय करण्याचं बळ कसं मिळालं. एक फुटकी कौडी देखील नव्हती त्यातून त्यांनी 50 हजार रुपये महिना मिळेल असं विश्व कसं उभं केलं याची ही प्रेरणादायी कहाणी आहे.
advertisement
ही कहाणी आहे बार्थीच्या स्वाती यांची, दु:ख काय हे त्यांच्या माहेरी कधी पाहिलं नाही, लग्नानंतर नवरा गेला आणि पदरात फक्त संघर्ष आला. मात्र ती खचली नाही तेवढंच मन घट्ट करुन मुलीसाठी उभी राहिली. तिने एका मॅडमकडून पहिल्यांदा 2000 रुपये उसने घेतले. त्यातून तिने चहाचा स्टॉल लावला. त्या पाच दिवसांच्या स्टॉलमध्ये तिला 7000 रुपये मिळाले. हे पैसे पाहून आनंदाश्रू आले. आपण व्यवसाय करु शकतो याचं बळ मिळालं.
स्वाती यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंगपॉईंट ५ रुपयांसाठी पावलोपावली झालेला अपमान होता. एकदा त्यांनी 5 रुपये चुलत्यांकडून घेतले होते. त्यावर चुलते मुलीला सारखे सांगायचे आईकडून ५ रुपये घेऊन ये. त्या ५ रुपयांनी मला माझी किंमत काय आहे याची जाणीव करून दिली असं त्यांनी सांगितलं. केवळ ५ रुपये नसल्यामुळे झालेला तो अपमान स्वाती यांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी ठरवले की, आता केवळ रडायचे नाही तर लढायचे!
स्वाती यांनी त्यांनंतर लक्ष्मी सरसमध्ये आपला स्टॉल लावला. तिथेही त्यांनी गावातील महिलांकडून उधारीवर माल घेतला आणि तो लक्ष्मी सरसला विकला. त्यातून उधारी फेडली आणि नफा त्यांनी ठरवला. अजूनही त्या दुसऱ्यांसाठीच काम करत होत्या. त्यानंतर केरळला जाण्याची संधी मिळाली. 5 महिलांनी केरळमध्ये पुरणपोळी, कोल्हापुरी चिकनचा स्टॉल लावला. त्यातून 1 लाख ६० हजार रुपये मिळाले.
आपण चांगलं मार्केटिंग करू शकतो याचा कॉन्फिडन्स आला. त्यांनी स्वदेशी नावाने मार्केटिंग करायला सुरुवात केली. ज्या महिलांना मार्केटिंग करता येत नाही त्यांच्या वस्तू स्वाती आणि त्यांची मैत्रीण मिळून स्वदेशी नावाच्या ब्रॅण्डखाली विकू लागल्या. यातून 20 महिलांना पैसे मिळू लागले. तर स्वाती यांना यश आणि पैसा दोन्ही. ज्या 5 रुपयांसाठी इतका अपमान सहन केला, 2000 रुपये एकवेळा खिशात नव्हते आज त्याच स्वाती या महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत.
स्वाती म्हणतात की जिद्द असायला हवी, मार्केटमध्ये काय चालतं ते महत्त्वाचं, तुम्हाला काय आवडतं यावर व्यवसाय चालत नाही. आपल्या वस्तूचं मार्केटिंग करता यायला हवं. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वत काम करा, नोकर व्हा आणि मालकही स्वत: चा व्यवसाय करा. प्रत्येक स्त्रीने ठरवलं तर ती हे करू शकते असं त्या म्हणतात.
