भाजीवाल्याचा मुलगा बनला अधिकारी
छत्तीसगडच्या पंकज कुमार यादव यांचा प्रवास असाच काहीसा आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य, वडिलांचा भाजी विकायचे, पण अशा परिस्थितीतही पंकज यांनी राज्याचा 'डीएसपी' होण्यापर्यंत मजल मारली आहे. सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरचे राहणारे पंकज हे एका सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शहरात भाजीची हातगाडी लावून घराचा उदरनिर्वाह चालवायचे. घरात चार भावंडांची जबाबदारी आणि बेताची आर्थिक स्थिती असतानाही वडिलांनी पंकज यांना स्वप्न पाहण्यापासून कधीच रोखलं नाही. उलट, संधी मिळेल तेव्हा समाजाचा आदर करायला शिका,ही शिकवण त्यांना घरातून मिळाली.
advertisement
स्वप्नांमागे धावण्याचा असा सुरू झाला प्रवास
२०१४ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पंकज यांनी २०१७ मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.एस्सी. आणि २०१९ मध्ये गणितात एम.एस्सी. पूर्ण केली. उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले आणि CGPSC परीक्षेची तयारी सुरू केली. पंकज यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांनी पाहिलेल्या अपयशाची मालिका पाहून कोणाचेही धैर्य खचले असते
पाचवेळा अपयश त्यांनंतर आशेचा किरण
पहिली दोन वर्ष पूर्व परीक्षेत अपयश मिळालं. तिसरा आणि चौथ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचले, पण अंतिम निवड झाली नाही. पाचवा प्रयत्न जिद्दीने अभ्यास केला आणि ९० वी रँक मिळवून स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. मात्र, त्यांचे लक्ष्य काहीतरी वेगळंच होतं. ते त्यांना शांत बसू देत नव्हतं. खाकी वर्दी आणि डीएसपी पद मिळवायचं हे मनाशी पक्क होतं. इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्यानंतरही त्यांनी अभ्यास थांबवला नाही. अखेर २०२४ मध्ये सहाव्या प्रयत्नात त्यांनी संपूर्ण राज्यात १४ वी रँक मिळवली आणि त्यांचे डीएसपी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
काय होती यशाची रणनीती?
पंकज सांगतात की, वारंवार येणाऱ्या अपयशाने अनेकदा आशा तुटायची, पण इरादा मात्र अधिक घट्ट व्हायचा. गोंधळून न जाता संपूर्ण सिलॅबस नीट समजून घेतला. अनेक पुस्तकांऐवजी मोजक्या पण महत्त्वाच्या पुस्तकांवर भर दिला. जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्याने परीक्षेचा पॅटर्न समजण्यास मदत झाली. पाच वेळा अपयश येऊनही त्यांनी मैदान सोडले नाही, हेच त्यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक आहे. आज जेव्हा पंकज वर्दीत आपल्या वडिलांसमोर उभे राहतात, तेव्हा भाजी विकणाऱ्या त्या बापाच्या डोळ्यांतील आनंद गगनात मावेनासा असतो.
