इंदूर म्हणजे फक्त स्वच्छता नाही, तर चटकदार चवीची राजधानी! या शहराच्या 56 दुकान आणि सराफा बाजार मध्ये एक असा छोटा ब्रँड आहे, ज्याने देशभरातील खाद्यप्रेमींना वेड लावलं. 'जॉनी हॉट डॉग'चे मालक विजय सिंह यांच्या हातांनी तर कमाल केली. परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही. व्यवसाय केला आणि त्यात यशही मिळवून दाखवलं आहे. हॉट डॉग ब्रँडच्या फ्रेंचायझीसाठी आलेल्या तब्बल 200 कोटींच्या ऑफरलाही सहज नकार दिला! त्यांच्या हॉट डॉगसाठी आज मोठ्या कंपन्या रांगेत उभ्या आहेत.
advertisement
विजय सिंह साधा हॉट डॉगवाला ते ब्रँड किंग
विजय सिंह आपल्या एकाच तत्त्वावर ठाम आहेत. त्यांचं म्हणणं आहे की फ्रान्चायझी दिली आणि क्वालिटी घसरली तर ते चालणार नाही. त्यांच्यासाठी ग्राहक देवासारखा आहे. त्याचा विश्वास महत्त्वाचा आहे. याच धोरणामुळे एका छोट्या स्टॉलचा हा प्रवास आज 200 कोटींच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. 'जॉनी हॉट डॉग'चे सर्वेसर्वा विजय सिंह हे जास्त शिकलेले नाहीत. जवळपास ४० वर्षांपूर्वी त्यांनी येथे आपली एक लहानशी दुकान सुरू केली होती, जिथे ते बटाट्याच्या टिक्कीला बनमध्ये घालून विकायचे. शिक्षण कमी असले तरी त्यांच्या व्यावसायिक दूरदृष्टीने आज या छोट्या दुकानाचे रूपांतर एका मोठ्या ब्रँडमध्ये झाले आहे.
चवीचं रहस्य आणि हातांची जादू
जॉनी हॉट डॉगची सर्वात मोठी खासियत म्हणजे, येथे हॉट डॉग तेलात तळलेले नसतात, तर शुद्ध तुपात बनवलेले मिळतात. तुपात बनवलेले हे हॉट डॉग केवळ चविष्टच नव्हे, तर आरोग्यासाठीही चांगले असतात, असा विजय सिंह यांचा विश्वास आहे. विजय सिंह सांगतात की, लोकांना उत्तम प्रतीचा आणि चविष्ट हॉट डॉग खायला घालणे, हेच माझे उद्दिष्ट आहे. लहान मुले, वृद्ध लोक सर्वजण येथे आनंदाने खायला येतात. त्यामुळे त्यांना सर्वोत्तम गोष्ट देणे, ही माझी जबाबदारी आहे.
काय आहे हॉट डॉग?
येथे हॉट डॉग बनवण्यासाठी पाव/बन तुपात हलका ग्रील केला जातो. त्यामध्ये बटाट्याची टिक्की भरून लाल आणि हिरवी चटणी तसेच मिरचीसोबत तो ग्राहकांना दिला जातो. याच हॉट डॉगचा एक दुसरा प्रकार 'जॉनी हॉट डॉग'मध्ये मिळतो, ज्यात टिक्कीऐवजी ऑम्लेटचा वापर केला जातो. या खास ऑम्लेट हॉट डॉगला येथे बँजो असं म्हणतात म्हणतात. येथे काही दुकानदार एक्स्ट्रा बटर आणि नमकीनसोबतही हॉट डॉग देतात.
२०० कोटींचा ऑफर का नाकारला?
विजय सिंह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना फ्रेन्चायझीसाठी आतापर्यंत अनेक मोठ्या ऑफर आल्या, ज्यात काही मोठ्या कंपन्यांकडून २०० कोटी रुपयांपर्यंतचा ऑफर देखील करण्यात आली होती पण, त्यांनी आजपर्यंत आपला निर्णय बदलला नाही. खाण्याच्या गुणवत्तेशी आणि ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू शकत नाहीत, त्याचमुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.