व्हॉट्सअॅप युझर्ससाठी सातत्याने नवीन अपडेटवर काम करत असतं. आता अँड्रॉइड युझर्सना चॅटिंग करताना स्टीकर्स शेअर करता येणार आहेत. तसंच युझर्सना त्यांचे स्टीकर्स कस्टमाइजदेखील करता येतील. स्टीकर फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी खास पद्धतीने व्यक्त करू शकाल.
स्टीकर फीचरच्या माध्यमातून युझरला स्वतःचा स्टीकर पॅक तयार करता येईल. तसंच हा पॅक ते शेअरदेखील करू शकतील. याशिवाय एकाच वेळी पूर्ण स्टीकर पॅक तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करू शकाल. यासाठी तुम्हाला वेगवेगळे स्टीकर पाठवण्याची गरज पडणार नाही. व्हॉट्सअॅपवर तयार केलेल्या स्टीकर पॅकची लिंक तयार करता येईल. ही लिंक मित्रांना शेअर करता येईल. तुमचे मित्र या लिंकवरून थेट डाउनलोडदेखील करू शकतील.
advertisement
यामुळे थर्ड पार्टी स्टीकर्सची कोणतीही समस्या येणार नाही. तुम्ही या स्टीकर्सचीसुद्धा लिंक तयार करून संपूर्ण पॅक शेअर करू शकाल. या फीचरमध्ये तुम्हाला मॅनेजमेंट हा ऑप्शन मिळेल. तुम्हाला जे स्टीकर लायब्ररीत ठेवायचे आहेत ते ठेवू शकाल आणि नको असलेले डिलीट करू शकाल. या फीचरचं टेस्टिंग पूर्ण झाल्यावर येत्या काही महिन्यांत हे फीचर सुरू केलं जाईल.
WABetaInfo च्या वृत्तानुसार, हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपच्या 2.24.25.2 या बीटा व्हर्जनवर पाहायला मिळत आहे. नवीन फीचरचं सध्या टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे सध्या या फीचरचा वापर ठराविक अँड्रॉइड युझर्सना करता येईल. लवकरच अन्य युझर्ससाठी हे फीचर्स सुरू होईल, अशी शक्यता आहे.
याशिवाय व्हॉट्सअॅपवर नवीन टायपिंग इंडिकेटर पाहायला मिळेल. नवीन टायपिंग इंडिकेटर आयफोनच्या आय मेसेज अॅपसारखा असेल. यात तुम्हाला वरच्या बाजूला टायपिंग वर्डच्या जागी थ्री डॉट्स असलेला अॅनिमेटेड बबल दिसेल. हा वरच्या बाजूऐवजी चॅट स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसेल. हे फीचरदेखील लवकरच सुरू होऊ शकतं.