यंदा ख्रिसमस 2025 च्या मुहूर्तावर सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन युक्ती शोधली आहे. शुभेच्छांच्या नावाखाली तुमच्या मोबाईलमध्ये शिरून तुमचं बँक अकाउंट रिकामे करण्याचा डाव सायबर टोळ्यांनी आखला आहे. नेमका हा 'ख्रिसमस WhatsApp स्कॅम' काय आहे आणि स्वतःला कसं वाचवायचं? हे शेवटपर्यंत नक्की वाचा.
या वेळच्या स्कॅमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, हा मेसेज तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून नाही, तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या WhatsApp नंबरवरून येतो. सायबर पोलिसांच्या मते, ठग आधी एका व्यक्तीचं अकाउंट हॅक करतात आणि त्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना फसव्या लिंक पाठवतात. समोरच्याला वाटतं की आपल्या जवळच्या माणसानेच शुभेच्छा पाठवल्या आहेत, आणि तिथेच फसवणुकीची पहिली पायरी सुरू होते.
advertisement
कसं काम करतं हे 'ख्रिसमस गिफ्ट'चं जाळं?
1. आकर्षक मेसेज: तुम्हाला मेसेज येईल - “Merry Christmas! तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळालं आहे” किंवा “ख्रिसमस बोनस क्लेम करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.”
2. फसवणूक करणाऱ्या वेबसाईट: लिंकवर क्लिक करताच तुम्ही एका हुबेहूब मोठ्या ब्रँड किंवा बँकेसारख्या दिसणाऱ्या वेबसाईटवर जाता. तिथे तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि बँकेची माहिती भरण्यास सांगण्यात येते.
3. मॅलवेयरचा शिरकाव: काही वेळा लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये एक छुपे सॉफ्टवेअर (Malware) डाऊनलोड होतं. या सॉफ्टवेअरमुळे ठगांना तुमच्या फोनचा ताबा मिळतो. ते तुमचे OTP वाचू शकतात आणि तुमच्या संमतीशिवाय पैसे ट्रान्सफर करू शकतात.
सणासुदीलाच ठग सक्रिय का होतात?
तज्ज्ञांच्या मते, सणांच्या काळात लोक मानसिकदृष्ट्या रिलॅक्स असतात. आनंदाच्या भरात आपण मेसेजची सत्यता तपासण्याऐवजी तो पुढे पाठवण्यावर भर देतो. ठग मेसेजमध्ये 'लिमिटेड ऑफर' किंवा 'आजच शेवटची संधी' असे शब्द वापरतात, ज्यामुळे घाईघाईत लोक विचार न करता क्लिक करतात.
फसवणुकीचे संकेत कसे ओळखावे?
जर कोणी विनाकारण मोफत पैसे किंवा महागडे गिफ्ट देण्याचा दावा करत असेल. मेसेजमधील शब्दांचे स्पेलिंग चुकीचे असतील किंवा वेबसाईटची लिंक 'विचित्र' वाटत असेल. तर सावध व्हा.
स्वतःचा बचाव कसा करावा?
1. लिंकवर क्लिक करू नका: ओळखीच्या व्यक्तीकडून मेसेज आला तरी, आधी त्या व्यक्तीला फोन करून विचारून घ्या की त्यांनीच तो मेसेज पाठवला आहे का
2. गोपनीय माहिती शेअर करू नका: कोणतीही वेबसाईट किंवा ॲप तुमची बँक डिटेल्स, CVV किंवा OTP मागत असेल तर ती तात्काळ बंद करा.
3. टू-स्टेप व्हेरिफिकेशन: तुमच्या WhatsApp मध्ये 'Two-Step Verification' नक्की चालू ठेवा.
4. संशयास्पद ॲप: चुकून एखादे ॲप इन्स्टॉल झाले तर लगेच इंटरनेट बंद करा, ते ॲप डिलीट करा आणि बँकेला कळवा.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुम्ही या ठगांचे शिकार झाला असाल, तर वेळ न घालवता राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 वर कॉल करा. तसेच cybercrime.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा. तुम्ही जितक्या लवकर तक्रार कराल, तितकी तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते.
