ठाणे परिवहन मंडळाचा, 25 बसेस पहिल्या टप्प्यामध्ये प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्याचा मानस आहे. म्हणून त्याआधी दोन बस विविध मार्गांवर प्रायोगिक तत्त्वांवर चालवली जात आहे. यामध्ये बसेसची तांत्रिक क्षमता तपासली जात आहे. येऊर- घोडबंदर मार्ग, गायमुख घाट, भाईंदरपाडा- ठाणे ते बोरिवली, तसेच मुंब्रा आणि दिवा परिसरातील मार्गांवरही या बसची चाचणी घेतली जात आहे. उतार- चढाव, तीव्र वळणे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या परिस्थितीत बसची कार्यक्षमता तपासली जात आहे.
advertisement
प्रायोगिक तत्त्वावर बस चालवताना परिवहन मंडळाला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याचा आढावा सध्या घेतला जात आहे. या चाचण्यांचा अहवाल तयार करून तो संबंधित उत्पादक कंपनीकडे पाठवण्यात येणार आहे. अहवालातील निरीक्षणांच्या आधारे आवश्यक सुधारणा केल्यानंतर बस टप्प्याटप्प्याने ठाणेकरांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे. या योजनेतील 25 बसेस स्वातंत्र्यदिनी ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तांत्रिक तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्या त्रुटी दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा परिक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत ठाणे परिवहन सेवेत यापूर्वीच 123 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 9 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या बसचा समावेश असून त्या बसेसमध्ये सुमारे 40 प्रवाशांची आसनक्षमता आहे. डिझेल बसेसच्या तुलनेत कमी खर्च आणि पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांमुळे या बस भविष्यात परिवहन सेवेसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे बोलले जात आहेत.
