वाहने भाड्याने देण्याच्या नावाखाली 42 लाखांची फसवणूक करणाऱ्या संदीप शेट्टी (रा. उलवे, नवी मुंबई) याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सोमवारी दिली. त्याच्या ताब्यातून तब्बल दोन कोटी 44 लाख 15 हजार रुपये किमतीची 32 विविध चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
नेमकं काय घडलं?
advertisement
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका रहिवाशाची पाच चारचाकी वाहने संदीपने दरमहा भाडे देण्याचे आश्वासन देत ताब्यात घेतली. सुरुवातीला विश्वास संपादन करून त्याने गाड्या घेतल्या, मात्र नंतर कोणतेही भाडे दिले नाही आणि वाहने परतही केली नाहीत.
तपासात समोर आले की, हीच वाहने त्याने इतर व्यक्तींकडे परस्पर गहाण ठेवली होती. अशा प्रकारे वाहनांचा अपहार करून संबंधितांची फसवणूक करण्यात आली.
6 महिने मेहनत, पण वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, मोसंबीच्या बागेत भयंकर अवस्थेत आढळला सुशांत
प्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात 5 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडून सुरू होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी संदीपला अटक केली.
दोन कोटींची वाहने हस्तगत
पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले, सहायक पोलिस निरीक्षक शरद पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण आणि परभणी येथून एकूण 32 वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एकूण किंमत दोन कोटी 44 लाख 15 हजार रुपये इतकी आहे.
आधीचे गुन्हेही उघड
चौकशीत आरोपीने अनेकांना जादा भाड्याचे आमिष दाखवून त्यांची वाहने ताब्यात घेतल्याची कबुली दिली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध नवी मुंबई येथेही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






