नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ललिता (नाव बदललं आहे) या मीरा रोडच्या 'चंद्रेश अकॉर्ड' सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये घरकाम करत होत्या. बुधवारी रात्री आरोपी आशिष मेश्राम याने ललिता यांच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ललिता यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने तातडीने पळ काढला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला आणि त्याला आंध्र प्रदेशातून बेड्या ठोकल्या.
advertisement
लैंगिक छळ आणि हत्येची धमकी
या प्रकरणाचा उलगडा करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी आशिष गेल्या काही काळापासून ललिता यांच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करत होता. ललिता यांनी ही मागणी वारंवार धुडकावून लावली होती. तरीही आरोपी वारंवार तिचा छळ करत होता. धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी महिन्यात आरोपीनं ललिता यांच्या मुलाला फोन करून धमकी दिली होती की, "तुझ्या आईने माझ्याकडे काम करणं बंद केलं किंवा माझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मी तिला जीवे मारीन."
या धमकीनंतर ललिता यांच्या मुलाने आशिषला गाठून चोप देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी आरोपी घरी नव्हता. काही दिवसांनी आरोपीच्या मोठ्या भावाने ललिता यांना आश्वासन दिलं होतं की, आशिष आता त्या फ्लॅटमध्ये राहत नाही. या आश्वासनावर विश्वास ठेवून ललिता यांनी पुन्हा त्या घरात कामाला जाण्यास सुरुवात केली. मात्र, बुधवारी रात्री ललिता कामावर आल्याचं पाहून आरोपीनं घरात प्रवेश केला आणि त्यांची निर्घृण हत्या केली.
कष्टकरी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
मयत ललिता या काशीमीरा भागात आपल्या पती आणि चार मुलांसह राहत होत्या. त्यांचे पती चर्मकार असून, ललिता स्वतः ८-९ घरांमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या मेश्राम यांच्याकडे काम करत होत्या. एका मेहनती महिलेचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मीरा रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो सध्या ट्रान्झिट रिमांडवर आहे. त्याला मीरारोडला आणल्यावर हत्येमागचा नेमका घटनाक्रम आणि इतर पुराव्यांचा तपास केला जाणार आहे.
