जाणून घ्या वाहतूक बदल
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावानुसार जत्राकाळात काही प्रमुख मार्गांवर वाहनांना थेट प्रवेश दिला जाणार नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून हे बदल 17 जानेवारी 2026 रोजी रात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. जत्रेदरम्यान ठाणे जिल्ह्यासह रायगड, पुणे, नाशिक, मुंबई, पालघर आणि कोकणातील विविध भागांतून सुमारे 17 ते 18 लाख भाविक मुरबाडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
advertisement
या काळात मुरबाड शहर, बाजारपेठ, एसटी स्थानक, मुख्य चौक आणि जोडरस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढते. जत्रेच्या निमित्ताने बैल बाजारासह गुरांची खरेदी-विक्री, तात्पुरत्या बाजारपेठा आणि विविध वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांकडून तपासणी नाके, बॅरिकेडिंग आणि दिशादर्शक फलक उभारण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस पथके व वाहतूक शाखेचा विशेष बंदोबस्तही तैनात राहणार आहे.
जड-अवजड वाहनांसाठी मुरबाड-म्हसा-कर्जत मार्गावर निर्बंध घालण्यात आले असून त्यांना पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. मात्र रुग्णवाहिका, शासकीय आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
