नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या 500 बस आहेत. यातील 400 ते 425 बस या रस्त्यावर उतरून रोज प्रवाशांना सेवा देतात. मात्र, प्रवाशांची गर्दी विचारात घेता या बस अपुऱ्या पडत आहेत. शहरातील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता परिवहन उपक्रमाला आणखी 400 बसची गरज आहे. मात्र, बसच उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
advertisement
प्रवाशांची गरज लक्षात घेऊन वर्षभरापूर्वी परिवहन उपक्रमात 150 सीएनजी बस खरेदीचा निर्णय झाला होता. या बस टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यात येणार होत्या. आता मार्च अखेरीपासून एनएमएमटीच्या ताफ्यात बस दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास सोपा होणार आहे.
दरम्यान, एनएमएमटीच्या वतीने नवी मुंबईबरोबरच, मुंबई, ठाणे, पनवेल, उरण आणि अगदी खोपोलीपर्यंत सेवा दिली जाते. त्यासाठी परिवहनच्या ताफ्यात अधिक बसगाड्यांची आवश्यकता आहे. सध्या सीएनजीबरोबरच बॅटरीवर धावणाऱ्या वातानुकूलित बस देखील वापरात आहेत. मात्र, नवी मुंबई परिवहन उपक्रमाने सीएनजी बस खरेदीलाच प्राधान्य दिले आहे.
इलेक्ट्रिकऐवजी सीएनजी बसला पसंती
गेल्या काही काळात एनएमएमटीने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस खरेदीला प्राधान्य दिले होते. त्यानुसार परिवहन उपक्रमात 100 हून अधिक इलेक्ट्रिक बस सेवा देत आहेत. परंतु, बऱ्याचदा इलेक्ट्रिक बस चार्जिंगअभावी रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. सततची समस्या टाळण्यासाठी एनएमएमटीने इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजीवर धावणाऱ्या बसकडे मोर्चा वळवला आहे. या मार्च महिनाअखेर सीएनजी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होतील, असे परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी सांगितले.
