भिवंडी: इराण आणि इस्त्रायलमधील युद्धामुळे देशभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, आता पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या आहे. जिकडे तिकडे अफवांना पेव फुटला आहे. पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. पण, या गर्दीत आता पेट्रोल पंपचालकांनी संधी साधली आहे. भिवंडीमध्ये एका खासगी पेट्रोल पंपचालकाने पेट्रोलच्या दरात थेट ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये वाढ केली आहे.
advertisement
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र-इंधनचा तुटवडा भास होत असतानाच भिवंडीत बोरपाडा येथील नायरा एनर्जी या खाजगी कंपनीच्या पेट्रोल पंपावर दर वाढीचा निर्णय घेतला आहे. नायरा एनर्जी असलेल्या या पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर हे ५ रुपयांनी तर डिझेलचे दर हे तीन रुपयांनी वाढले आहेत.
याआधी पेट्रोल 104.08 रुपये दराने मिळणारे पेट्रोल आता 109 .08 रुपये प्रतिलिटर झाल्याने पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपयांनी महागले आहे तर डिझेल प्रतिलिटर 90.35 दराने मिळणारे डिझेल आता 93.35 रुपये प्रतिलिटर होऊन डिझेल प्रतिलिटर 3 रुपयांनी महागले आहे.
दर का वाढवले?
सकाळी ६ वाजेपासून दर वाढवले आहे. आधी पेट्रोल १०४ रुपये दर होते, ते आता १०९ रुपये झाले आहे. तर डिझेलच्या दरात ३ रुपये वाढ करावी लागली आहे. आमचा हा खासगी पेट्रोल पंप आहे, त्यामुळे दर वाढवावे लागले. आता सरकार या परिस्थितीवर काय तोडगा काढते हे त्यावर सगळं अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया नायरा एनर्जी पेट्रोल पंपाचे विपुल सिंग यांनी दिली.
नायरा एनर्जी काय आहे?
नायरा एनर्जी (Nayara Energy) ही एक खासगी इंधन पुरवठा करणारी कंपनी आहे. आधी ही कंपनी एस्सार ऑईल (Essar Oil) नावाने ओळखली जात होती. २०१७ मध्ये रशियन कंपनी रोसनेफ्टने गुंतवणूक केल्यानंतर कंपनीचं नाव बदलण्यात आलं. नायरा एनर्जीची गुजरातमधील वाडिनार इथं ऑईल रिफानरी आहे. तिथून देशभरात पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करत असते. नायरा एनर्जीचे देशभरात 6500 पेक्षा जास्त पेट्रोल पंप आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नायरा एनर्जीचे पेट्रोल पंप आहे.
