ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन परिसरात गुरुवारी सायंकाळी एका गृहसंकुलाजवळ बिबट्या आढळला. या घटनेचे मोबाइल चित्रीकरण व्हायरल झाल्यानंतर वन विभाग आणि पोलिसांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान बिबट्या आढळून आला नाही.
advertisement
झुडपात बसलेला बिबट्या, नागरिकांमध्ये खळबळ
पोखरण रोड क्रमांक दोन येथील बेथनी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गृहसंकुलाजवळील झुडपात गुरुवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास एका महिलेला बिबट्या बसलेला दिसला. धाडस दाखवत संबंधित महिलेने तात्काळ त्याचे मोबाइलवर चित्रीकरण केले. हे चित्रीकरण गृहसंकुलातील रहिवाशांमध्ये पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.
यानंतर रहिवाशांनी तात्काळ याची माहिती वन विभाग व पोलिसांना दिली. माहिती मिळताच दोन्ही विभागांची पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसराची पाहणी करण्यात आली, मात्र बिबट्याचा मागमूस लागला नाही.
येऊर जंगलातून आल्याचा अंदाज
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी बिबट्या आढळून आला तो परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलापासून अवघ्या 500 ते 600 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा बिबट्या जंगलातून अन्नाच्या शोधात मानवी वस्तीच्या दिशेने आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शोध मोहिमेनंतर बिबट्या त्या भागात दिसून न आल्याने तो पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला असावा, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वन विभागाकडून परिसरात जनजागृती करण्यात आली. रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच बिबट्या दिसल्यास घाबरून न जाता तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.






