ट्रम्प यांनी पोस्टमध्ये सांगितलं की, हा टॅरिफ कर तत्काळ लागू केला जाईल. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही देशाला अमेरिकेसोबतच्या सर्व व्यवसायांवर २५% कर भरावा लागेल आणि हा कर तत्काळ लागू होईल. हा आदेश अंतिम आहे, असंही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेचा इराणसोबत वाद पण फटका भारताला
इराणमध्ये सध्या सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यांनी वारंवार इराणला धमकी देखील दिली आहे. आता इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यांनी इराणसोबत व्यवसाय करणाऱ्यांवर देशांवर २५ टक्के टॅरिफ कर लादण्याची घोषणा केली आहे. तथापि, याचा परिणाम जागतिक स्तरावर अमेरिकेच्या संबंधांवरही होऊ शकतो. कारण इराणच्या भागीदारांमध्ये केवळ शेजारी देशच नाहीत तर भारत, तुर्की, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे इतर देश देखील आहेत.
advertisement
ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयात अद्याप हे शुल्क कसे लागू केले जातील, कोणत्या देशांवर काय परिणाम होईल आणि कोणाला सूट दिली जाईल का? याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
अमेरिका आणि इराणमधील तणाव
इराणमधील आंदोलनामुळे अमेरिका आणि इराणमध्ये लक्षणीय तणाव आहे. इराणमध्ये दोन आठवड्यांहून अधिक काळापासून सरकारविरोधी निदर्शनं सुरू आहेत. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत सुमारे 600 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे, तर 10,670 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अमेरिका आणि ट्रम्प यांनी निदर्शकांना पाठिंबा जाहीर केला आहे. निदर्शकांना मारले गेले किंवा त्यांच्यावर हिंसाचार झाला तर त्यांना अमेरिका मदत करेल, अशी धमकी ट्रम्प यांनी वारंवार दिली आहे. याशिवाय, व्हाईट हाऊसकडून इराणविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करत आहेत. ज्यामध्ये हवाई हल्ल्याचा देखील समावेश आहे.
