इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशिया तणावाच्या छायेत आहे. या संघर्षादरम्यान शेजारील देशांवर क्षेपणास्त्र हल्ले झाले. त्याचा परिणाम इतर देशांवरही दिसू लागला. भारतात एलपीजीच्या किमती वाढल्या, तर अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर झपाट्याने वाढू लागले. या पार्श्वभूमीवर इराणचा सूर काहीसा मवाळ झाल्याचे दिसत असून होर्मुजबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
advertisement
होर्मुजमध्ये पुन्हा जहाजांचे हॉर्न
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले की, इराणला आपल्या कोणत्याही शेजारी देशावर हल्ला करण्याचा हेतू नाही. त्यांनी शेजारी देशांची माफी मागत असेही जाहीर केले की, जर ते देश या संघर्षात अमेरिकेला साथ देणार नसतील तर त्यांच्यावर कोणताही हल्ला केला जाणार नाही.
या एका विधानाचा मोठा परिणाम झाला आहे. जगातील तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला Strait of Hormuz हा समुद्री मार्ग, जो काही काळापासून धोकादायक आणि तणावपूर्ण बनला होता, तिथे आता पुन्हा जहाजांची हालचाल सुरू झाली आहे. बंदरांच्या परिसरात पुन्हा जहाजांचे हॉर्न ऐकू येऊ लागल्याचे सांगितले जात आहे.
होर्मुज परिसरातील सध्याची स्थिती
ही केवळ एक राजनैतिक घोषणा नसून अब्जावधी डॉलरच्या व्यापाराशी आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या गरजांशी संबंधित मोठा बदल मानला जात आहे. या घोषणेनंतर होर्मुजच्या आसपास कार्गो जहाजांची हालचाल पुन्हा सुरू होत असल्याचे दिसत आहे. माहितीनुसार अनेक व्यापारी जहाजे जी या महत्त्वाच्या समुद्री मार्गाच्या एका बाजूला अडकून पडली होती, ती आता पुढे सरकू लागली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला पुन्हा गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतावर काय होऊ शकतो परिणाम?
तज्ज्ञांच्या मते इराणच्या या मवाळ भूमिकेमुळे समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारात पुन्हा स्थिरता आणि शांतता परतू शकते. गेल्या काही दिवसांत युद्धाच्या भीतीमुळे मालवाहू जहाजांच्या हालचालींवर मोठा परिणाम झाला होता. मात्र भारतासाठी सध्या दिलासादायक बाब म्हणजे देशाकडे तेल आणि आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे तातडीने घाबरण्याचे कारण नाही.
जर इराणने आपली ही भूमिका कायम ठेवली आणि तणाव कमी झाला, तर व्यापारी कंपन्यांचा भीतीचा वातावरण कमी होईल. परिणामी समुद्री मार्गाने होणारी जहाजांची ये-जा पुन्हा पूर्वीसारखी सुरळीत आणि निर्भयपणे सुरू होण्याची शक्यता आहे.
