पृथ्वीच्या एका टोकाला रशियासारखा बलाढ्य देश वसला आहे, तर दुसऱ्या टोकाला अमेरिकेसारखा विकसित देश आहे. पण असं म्हणतात की पृथ्वी गोल आहे. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या एका बाजूच्या सीमा एकमेकांच्या जवळ आहेत. त्यांच्या मध्ये डायोमेड नावाची दोन बेटं आहेत. त्यापैकी एक आहे बिग डायोमेड, तर दुसरं आहे लिटिल डायोमेड. 16 ऑगस्ट 1728 रोजी या बेटांचा शोध लावणाऱ्या डॅनिश-रशियन नेव्हिगेटर वायटस जोनासन बेरिंग यानं त्यांना ही नावं दिली. ग्रीक संत डायोमेड यांचं नाव बेटांना द्यायचं त्यानं निश्चित केलं.
advertisement
डायोमेड आयलंडचा अर्थ काय?
अमेरिकेतील अलास्का राज्यापासून रशियाच्या मुख्य भूमीला वेगळं करणारी बेरिंग सामुद्रधुनी दोन लहान खडकाळ बेटांनी विभागलेली आहे. ती म्हणजे डायोमेड बेटं.
मोठ्या बेटाला बिग डायोमेड किंवा ‘Ratmanov Island’ असंही म्हटलं जातं. हा रशियाचाच एक भाग आहे. तसंच रशियाच्या सर्वात पूर्वेकडील टोक याला मानलं जातं. युनायटेड स्टेट्सकडून लिटल डायोमेड बेटाचा कारभार पाहिला जातो. त्याला इनुपियाक संस्कृतीमध्ये ‘Ialiq’ म्हणून ओळखलं जातं.
काल आणि उद्याची बेटं
या दोन्ही बेटांना यस्टर्डे आणि टुमॉरो म्हणजेच काल आणि उद्या असं म्हटलं जातं. कारण त्यांच्या मधून इंटरनॅशनल डेट लाइन जाते. स्थानिक पद्धतीनं स्थापन केलेल्या टाइम झोनमुळे उद्याचं बेट कालच्या बेटापेक्षा 21 तास पुढे आहे. वेळेमध्ये इतका फरक असूनही, दोन्ही प्रदेशातल्या तापमानामुळे दोन्ही बेटांवर हिवाळ्यात बर्फ असतो. लिटल डायोमेडवर फारच थोडी लोकसंख्या आहे.
बिग डायोमेड
बिग डायोमेडचं क्षेत्रफळ 29 चौरस किलोमीटर आहे. बेटाचा सर्वोच्च बिंदू समुद्रसपाटीपासून 477 मीटर उंचीवर आहे. या बेटावर कायमस्वरूपी राहणारे लोक नसले, तरी हे बेट रशियन हवामान केंद्र आणि सीमेवरच्या सेवांबाबतचं केंद्र म्हणून महत्त्वाचं आहे.
बिग डायोमेड बेटावर, तुम्हाला सुमारे 11 वेगवेगळ्या समुद्री पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये गिलमोट्स आणि पफिन्स (guillemots and puffins) हे सागरी पक्षी आढळतात. बेटावर आणि आजूबाजूला, तुम्हाला बोहेड (Bowhead) आणि ग्रे व्हेल, ध्रुवीय अस्वल, सील आणि पॅसिफिक वॉलरस यांसारख्या सस्तन प्राण्यांच्या प्रजातीदेखील आढळू शकतात.
लिटल डायोमेड
लिटल डायोमेड बेट, दोन डायोमेड बेटांपैकी लहान बेट आहे. त्याचा आकार अंदाजे 7.3 चौरस किलोमीटर आहे आणि ते अलास्काच्या मुख्य भूमीपासून सुमारे 25 किलोमीटर पश्चिमेला वसलेलं आहे. बेटाचा सर्वोच्च बिंदू समुद्रसपाटीपासून 494 मीटर उंचीवर आहे.
या बेटावरचं लोकसंख्या असलेले एकमेव ठिकाण म्हणजे डायोमेड (किंवा इलियाक) हे गाव. ते पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं आहे. इनुपियाक संस्कृतीचे लोक तिथं राहतात. या बेटावर उन्हाळाही तुलनेनं थंडच असतो. त्यावेळी तिथं सरासरी 4 ते 10 अंश सेल्सिअस तापमान असतं आणि अत्यंत हिवाळ्यात सरासरी तापमान -12 ते -14 अंश सेल्सिअस असतं. हे बेट धुक्यानं झाकलेलं असतं आणि संपूर्ण उन्हाळ्यात तिथे आकाश ढगाळ असतं.
बेटांचा पुन्हा पुन्हा शोध
रशियन नौदल शोधकर्ता सेमियन डेझनेव्ह (Semyon Dezhnev) हा 1648 मध्ये डायोमेड बेटांना भेट देणारा पहिला युरोपियन होता. डॅनिश-रशियन शोधक वायटस जोनासन बेरिंग यांनी 16 ऑगस्ट 1728 रोजी बेटांचा शोध लावला. त्यावेळी रशियन ऑर्थोडॉक्स चर्चनं ग्रीक सेंट डायोमेडीजचं स्मरण करुण तो दिवस साजरा केला. त्यामुळे त्या बेटांना डायोमेडीज यांचं नाव देण्यात आलं.
1867 मध्ये रशियानं अलास्का भाग युनायटेड स्टेट्सला सोपवला, तेव्हा दोन्ही देशांमधल्या सीमा या दोन बेटांच्या मध्यभागी अगदी निम्म्यावर असतील असं त्या अटींमध्ये नमूद करण्यात आलं होतं. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि आधीच्या सोव्हिएत युनियन दरम्यान असलेली ही सीमा ‘बर्फाचा पडदा’ म्हणून ओळखली जात होती.
