ट्रम्प यांनी आरोप केला की, कॅनडा अमेरिकन बाजारात चिनी वस्तू पोहोचवण्यासाठी एक प्रकारचा “मार्ग” किंवा “ड्रॉप ऑफ पोर्ट” बनू शकतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना लक्ष्य करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिका कॅनडाला चीनसाठी मध्यस्थ बनू देणार नाही.
जर गव्हर्नर कार्नीला वाटत असेल की तो कॅनडाला चीनसाठी एक ‘ड्रॉप ऑफ पोर्ट’ बनवू शकतो, जिथून चीन अमेरिकेत वस्तू पाठवेल, तर तो मोठ्या भ्रमात आहे, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
advertisement
याच पोस्टमध्ये ट्रम्प यांनी चीनबाबत अतिशय आक्रमक भाषा वापरत म्हटले की, बीजिंग कॅनडाला अक्षरशः खाऊन टाकेल आणि कॅनडाचा व्यवसाय, अर्थव्यवस्था तसेच सामाजिक रचना पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. ट्रम्प यांच्या मते, चीनसोबतचा कोणताही करार कॅनडासाठी घातक ठरू शकतो.
ट्रम्प यांनी पुढे स्पष्ट केले की, कॅनडाने चीनसोबत व्यापार करार केल्यास अमेरिकेची प्रतिक्रिया तात्काळ आणि कठोर असेल. जर कॅनडाने चीनसोबत करार केला, तर लगेचच त्यांच्यावर 100 टक्के टॅरिफ लावण्यात येईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अलीकडेच चीन दौऱ्यावर असताना चीनला “विश्वासार्ह आणि अंदाज करता येणारा भागीदार” असे संबोधले होते. या दौऱ्यानंतर कॅनडा आणि चीनमध्ये काही महत्त्वाचे करार झाले असून, त्यामध्ये कॅनडाच्या काही कृषी उत्पादनांवरील टॅरिफ कमी करणे आणि कॅनडामध्ये चिनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी कोटा निश्चित करणे यांचा समावेश आहे.
या चीनसोबतच्या जवळिकीबाबत विचारले असता, ट्रम्प यांनी सुरुवातीला थोडा सौम्य सूर लावत, “ठीक आहे. त्याने तेच करायला हवं,” असेही म्हटले होते. मात्र त्यानंतर दिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत कॅनडाला स्पष्ट धमकी दिली.
दरम्यान मागील आठवड्यात ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये मार्क कार्नी यांनी जाहीर केले होते की, “आम्ही चीनसोबत नवीन व्यापार करार सुरक्षित केला आहे, ज्यामुळे कॅनडातील कामगार आणि उद्योगांसाठी 7 अब्ज डॉलरहून अधिकच्या निर्यात संधी खुल्या होतील.”
याचदरम्यान ट्रम्प यांनी आज कॅनडावर आणखी एक आरोप करत, ग्रीनलँडमध्ये प्रस्तावित असलेल्या अमेरिकेच्या ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला कॅनडाने विरोध केल्याबद्दल तीव्र टीका केली. ट्रम्प यांच्या मते कॅनडा स्वतःच्या सुरक्षेलाच धक्का देत असून, एकीकडे चीनसोबत जवळीक वाढवत आहे.
ट्रम्प यांनी दावा केला की, ही ‘गोल्डन डोम’ प्रणाली उभारल्यास ती आपोआपच कॅनडालाही संरक्षण देईल, तरीही कॅनडा या प्रकल्पाला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याआधी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले होते, “आम्ही असा गोल्डन डोम उभारत आहोत की, तो आपल्या स्वभावानेच कॅनडाचे संरक्षण करेल.” ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले की, कॅनडाला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतात. “कॅनडाला आमच्याकडून अनेक ‘फ्रीबीज’ मिळतात. त्यांनी याबद्दल कृतज्ञ असायला हवं,” असेही ते म्हणाले.
इतकेच नव्हे, तर ट्रम्प यांनी कॅनडाच्या सुरक्षेबाबत अत्यंत वादग्रस्त विधान करत म्हटले, “कॅनडा अमेरिकेमुळेच अस्तित्वात आहे.” या विधानामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान चीन दौऱ्यावरून कॅनडात परतल्यानंतर पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांच्या या दाव्यांना ठामपणे प्रत्युत्तर दिले. कॅनडाचे अस्तित्व किंवा सुरक्षा अमेरिकेवर अवलंबून असल्याचा दावा त्यांनी साफ फेटाळून लावला असून, कॅनडा एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि स्वतःच्या हिताचे निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
