याआधी मागच्या आठवड्यातही ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टीम कुक यांना भारतात आयफोन बनवू नका असं सांगितलं होतं. 'काल मला टीम कुक यांच्यासोबत थोडी अडचण झाली. ते संपूर्ण भारतात उत्पादन करत आहेत. तुम्ही भारतात उत्पादन करावे असे मला वाटत नाही', असं ट्रम्प म्हणाले होते.
अॅपल त्यांचे बहुतेक आयफोन चीनमध्ये बनवते आणि अमेरिकेत या स्मार्टफोनचे उत्पादन करत नाही. अॅपलने मार्चपर्यंतच्या 12 महिन्यांमध्ये भारतात 22 अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन असेंबल केले, ज्यामुळे उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 60% वाढ झाली.
advertisement
कंपनीची 2.56 बिलियन डॉलरची गुंतवणूक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपल कंपनी त्यांच्या कर्नाटकमधील देवनहल्ली प्लांटमध्ये 2.56 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अॅपलचे प्लांट देवनहल्लीच्या दोड्डागोल्लाहल्ली आणि चप्परदहल्ली गावात पसरलेले आहेत. अॅपलचे हे प्लांट्स बंगळुरूतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 34 किमी अंतरावर आहे. अॅपलचं या वर्षी डिसेंबर 2025 पर्यंत एक लाख आयफोन उत्पादनाचे लक्ष्य असण्याची शक्यता आहे.
आकडेवारी काय सांगते?
एस अँड पी ग्लोबलच्या मते, 2024 मध्ये अमेरिकेत 75.9 दशलक्ष युनिट्स आयफोनची विक्री झाली, त्यापैकी मार्चमध्ये भारतातून 3.1 दशलक्ष युनिट्सची निर्यात झाली. एवढेच नाही तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिलमध्ये घोषणा केली होती की गेल्या आर्थिक वर्षात भारतातून 1.5 लाख कोटी रुपयांचे आयफोन निर्यात करण्यात आले आहेत.
भारतातील आयफोनची अमेरिकेत विक्री
तैवानची कंपनी फॉक्सकॉन आणि भारतीय कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स भारतात अॅपल आयफोन बनवतात. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच कंपनीच्या तिमाही निकालांनंतर सांगितले की जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतात बनवले जातील. कारण अॅपल देखील त्यांची पुरवठा साखळी चीनपासून दूर हलवत आहे.
