ढाका: बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदू व्यक्तीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरियतपूर जिल्ह्यात 31 डिसेंबर रोजी 50 वर्षीय खोकोन दास यांच्यावर जमावाने अमानुष हल्ला केला.
खोकोन दास हे घरी परतत असताना अचानक काही लोकांच्या जमावाने त्यांना घेरले. सुरुवातीला धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, त्यानंतर निर्दयपणे मारहाण करण्यात आली आणि अखेरीस त्यांना जिवंत जाळण्यात आले. या भीषण हल्ल्यात खोकोन दास गंभीररीत्या भाजले गेले आहेत.
advertisement
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मागील महिन्यात हिंदू युवकाला झाडाला लटकवून जाळण्यात आले होते. बांगलादेशात 15 दिवसांच्या आत दुसऱ्यांदा हिंदू व्यक्तीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. यापूर्वी 18 डिसेंबर रोजी मयमनसिंग जिल्ह्यात हिंदू युवक दीपू चंद्र दास याला जमावाने बेदम मारहाण करून ठार केले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून आग लावण्यात आली होती.
दीपू दास यांच्यावर ईशनिंदेचे खोटे आरोप करत जमावाने हल्ला केला होता. दीपू हे एका कापड कारखान्यात काम करत होते. मात्र या प्रकरणाच्या तपासात असे स्पष्ट झाले की, ज्या आरोपांच्या आधारे जमावाने हल्ला केला, त्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
सोशल मीडियावर असा आरोप करण्यात आला होता की, दीपू चंद्र दास यांनी फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणारी टिप्पणी केली होती. मात्र तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की, अशी कोणतीही पोस्ट किंवा टिप्पणी अस्तित्वात असल्याचा आजपर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नाही.
बांगलादेशात 12 दिवसांत 3 हिंदूंची हत्या
बांगलादेशात अवघ्या 12 दिवसांत तीन हिंदूंच्या हत्या झाल्याचे समोर आले आहे. 18 डिसेंबर रोजी दीपू चंद्र दास यांच्या हत्येनंतर, 24 डिसेंबर रोजी जमावाने आणखी एका हिंदू युवकाची मारहाण करून हत्या केली. ही घटना राजबाडी जिल्ह्यातील होसेनडांगा गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख 29 वर्षीय अमृत मंडल उर्फ सम्राट अशी झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, खंडणी वसुलीच्या आरोपाखाली अमृतला जमावाने ठार मारले. अमृत हा होसेनडांगा गावाचाच रहिवासी होता. पोलिसांच्या माहितीनुसार, अमृतविरोधात पांगशा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते, त्यापैकी एक हत्या प्रकरणाशी संबंधित होता.
यानंतर 29 डिसेंबर रोजी मयमनसिंग जिल्ह्यातील एका कापड कारखान्यात हिंदू कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना भालुका उपजिल्ह्यातील सुलताना स्वेटर्स लिमिटेड या कारखान्यात घडली. या घटनेत मृत व्यक्तीची ओळख 42 वर्षीय बजेंद्र बिस्वास अशी झाली असून, ते त्या कारखान्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते.
