जॉर्जियातील ग्विनेट काउंटी पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विजय कुमार (वय 51, अटलांटा) याने घरात गोळीबार केल्याने त्याची पत्नी मीमू डोगरा (43), गौरव कुमार, निधी चंदर आणि हरिश चंदर यांचा जागीच मृत्यू झाला. सर्वांच्या शरीरावर गोळी लागल्याच्या जखमा आढळल्या आहेत.
घटनेच्या वेळी घरात तीन लहान मुले झोपलेली होती. गोळीबार सुरू होताच जीव वाचवण्यासाठी ही मुले कपाटात लपली. यातील एका मुलाने धाडस दाखवत 911 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. या फोनमुळेच पोलिस काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचू शकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
शुक्रवारी पहाटे सुमारे 2.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) ब्रुक आयव्ही कोर्ट परिसरातील एका घरातून गोळीबाराची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर घरात चार प्रौढांचे मृतदेह आढळले.
या घटनेबद्दल अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत दिली जात आहे, असे दूतावासाने ‘एक्स’वर म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर चार गंभीर हल्ल्याचे गुन्हे, चार फेलनी मर्डर, चार मॅलिस मर्डर, बालांवरील क्रूरतेचे (पहिल्या व तिसऱ्या दर्जाचे) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
