सॅटेलाईट फोटोंमधून समोर आले नुकसान
'व्हेन्टर'ने सोमवारी मिळवलेल्या सॅटेलाईट फोटोंनुसार, रास तनुरा येथील दोन मोठ्या प्रोसेसिंग युनिट्समध्ये लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये प्रकल्पातील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचे दिसून आले होते.
इराणने नेमकं काय म्हटले?
इराणने शेजारील देशांमधील अमेरिकेच्या तळावर हल्ले सुरू ठेवले आहेत. सौदी अरामको रिफायनरी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे इराणे म्हटले असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. हा इस्रायलचा 'फॉल्स फ्लॅग' (दुसऱ्याच्या नावावर हल्ला करणे) ऑपरेशनचा भाग असू शकतो, असा दावा इराणने केला आहे. "आम्ही या भागातील अमेरिकन आणि इस्रायली तळांना लक्ष्य करू असे स्पष्ट केले, परंतु अरामकोच्या (Aramco) सुविधा आमच्या लक्ष्यावर नव्हत्या," असे इराणच्या लष्करी सूत्रांनी सांगितले.
जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम?
रास तनुरा हे केवळ एक रिफायनरी केंद्र नसून, जगातील सर्वात मोठे 'ऑफशोअर लोडिंग टर्मिनल' आहे. येथून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची निर्यात केली जाते. सध्या 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) येथील टँकर वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. रिकामे टँकर सध्या लोडिंगसाठी अरबी आखातात प्रवेश करत नसल्याने आगामी काळात तेल पुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
सौदी अरामको महत्त्वाचा का?
सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक आहे. ती सौदी अरेबिया सरकारच्या मालकीची आहे. अमेरिकन कंपन्यांशी झालेल्या करारानुसार १९३३ मध्ये ती स्थापन झाली. १९८० मध्ये, ती पूर्णपणे सौदी सरकारच्या नियंत्रणाखाली आली. कंपनीचे मुख्यालय धाहरान येथे आहे. अरामकोकडे जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक आहे. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था या कंपनीच्या महसुलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अरामको केवळ कच्च्या तेलाचे उत्पादन करत नाही तर शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स आणि नैसर्गिक वायूमध्ये देखील गुंतलेली आहे.
