युद्धाच्या गडद छायेत इराणने भारतासह आपल्या मित्र राष्ट्रांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे. इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेल्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' (Strait of Hormuz) भारतीय जहाजांना सुरक्षित प्रवासाची परवानगी जाहीर केली आहे.
मित्र राष्ट्रांना 'ग्रीन सिग्नल'
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान यांसारख्या मित्र देशांच्या जहाजांना होर्मुझमधून जाण्यास कोणताही अडथळा येणार नाही. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासानंही सोशल मीडियाद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युद्धाच्या परिस्थितीतही या देशांच्या व्यापारी जहाजांना इराणचे सशस्त्र दल संरक्षण आणि सुरक्षित मार्ग प्रदान करणार आहे.
advertisement
संयुक्त राष्ट्रांच्या आवाहनानंतर मोठा निर्णय
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी काही दिवसांपूर्वीच होर्मुझ मार्ग बंद राहिल्याने जागतिक स्तरावर तेल, गॅस आणि खतांच्या पुरवठ्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली होती. विशेषतः शेतीच्या हंगामात खतांचा पुरवठा खंडित झाल्याने सामान्य जनतेचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. या आवाहनाची दखल घेत इराणने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शत्रू देशांसाठी मार्ग बंदच!
परराष्ट्र मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले की, हा मार्ग केवळ मित्र राष्ट्रांसाठीच खुला असेल. अमेरिका, इस्रायल आणि या युद्धात इस्रायलला साथ देणाऱ्या आखाती देशांच्या जहाजांना या क्षेत्रातून प्रवेश दिला जाणार नाही. "आम्ही सध्या युद्धाच्या स्थितीत आहोत, त्यामुळे शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना आमच्या सागरी हद्दीतून जाण्याची परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भारतासाठी महत्त्वाचं...
भारत आपल्या गरजेच्या कच्च्या तेलाचा मोठा वाटा आखाती देशांतून आयात करतो. होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिल्याने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, आता भारताची दोन जहाजे नुकतीच या मार्गावरून सुरक्षितपणे रवाना झाली आहेत. रिलायन्ससारख्या मोठ्या कंपन्या आधीच इराणकडून तेल खरेदी करत आहेत. इराणच्या या निर्णयामुळे भारतातील इंधनाचे दर नियंत्रणात राहण्यास आणि खतांचा तुटवडा दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
