'खैबर शेकन' मिसाईल्सनी साधला निशाणा
इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, हा हल्ला 'खैबर शेकन' या अत्याधुनिक सॉलिड-फ्यूल बॅलिस्टिक मिसाईल्सद्वारे करण्यात आला आहे. तेहरानमधील तेल साठ्यांवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा हा चोख प्रत्युत्तर असल्याचा दावा इराणने केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये रिफायनरी परिसरात स्फोट आणि आगीचे गोळे दिसत आहेत, मात्र इस्रायलकडून अद्याप अधिकृत हानीची आकडेवारी स्पष्ट करण्यात आलेली नाही.
advertisement
इस्रायलच्या ऊर्जा व्यवस्थेला मोठा तडा
बाजान ग्रुपची ही रिफायनरी इस्रायलमधील सर्वात मोठा तेल प्रक्रिया प्रकल्प आहे. इस्रायलच्या एकूण इंधन पुरवठ्यापैकी ५० ते ६० टक्के वाटा उचलते. यापूर्वी जून २०२५ मध्येही येथे हल्ला झाला होता, परंतु आताचा हल्ला अधिक तीव्र असल्याचे मानले जात आहे. इराणने स्पष्ट संकेत दिले आहेत की, जर त्यांच्या ऊर्जा संसाधनांना धक्का लावला, तर इस्रायलचे आर्थिक केंद्र असलेले 'हाइफा आणि इतर रिफायनरी, ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला जाईल.
भारतासाठी ही रिफायनरी, बंदर महत्त्वाचं का?
हाइफा बंदर आणि त्याभोवतीचा औद्योगिक परिसर भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या काही बड्या कंपन्यांचा या बंदरात आणि आसपासच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठा सहभाग आहे. तसेच, भारत-इस्रायल व्यापार आणि समुद्री मार्गांवर या तणावाचा थेट परिणाम होऊ शकतो. आखातात कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इराणचा निर्वाणीचा इशारा
इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, "अमेरिका आणि इस्रायलच्या कोणत्याही हल्ल्याला आम्ही दुप्पट ताकदीने उत्तर देऊ." या विधानानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने चिंता व्यक्त केली आहे.
