महागडी क्षेपणास्त्रे विरुद्ध स्वस्त ड्रोन्स
या युद्धात अमेरिकेची 'पॅट्रियट एअर डिफेन्स' सिस्टिम इराणचे ड्रोन्स रोखण्यात ९० टक्के यशस्वी ठरली आहे. मात्र, यात एक मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. इराणचे एक ड्रोन साधारण २० हजार डॉलर्सचं (सुमारे १६-१८ लाख रुपये) आहे, पण ते पाडण्यासाठी अमेरिकेला ४० लाख डॉलर्स (सुमारे ३३ कोटी रुपये) किमतीचे क्षेपणास्त्र डागावे लागत आहे. हा खर्च अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
advertisement
इराणची रणनीती काय?
तज्ज्ञांच्या मते, इराण शत्रूला हळूहळू थकवण्याची रणनीती (War of Attrition) अवलंबत आहे. इराणचा असा अंदाज आहे की, सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे अमेरिका आणि आखाती देशांकडील महागडी क्षेपणास्त्रे संपतील, ज्यामुळे त्यांच्यावर युद्ध थांबवण्यासाठी राजकीय दबाव निर्माण होईल. त्याशिवाय, महत्त्वाची आणि शत्रूंचे नुकसान करणारी क्षेपणास्त्रे इराण अखेरच्या टप्प्यात वापरू शकतो, असं म्हटले जात आहे.
ड्रोन हल्ले रोखले नाही तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल आणि या ड्रोनला रोखण्यासाठी महागडी क्षेपणास्त्रे वापरावी लागत आहेत, अशा दुहेरी चक्रात अमेरिका अडकली आहे.
कोणाकडे किती दारुगोळा शिल्लक?
युद्धाच्या सुरुवातीला इराणकडे सुमारे २,००० बॅलिस्टिक मिसाइल्स होती. आतापर्यंत इराणने १,२०० हून अधिक मिसाइल्स आणि ड्रोन्स डागले आहेत. इराण अद्याप आपली सर्वात घातक क्षेपणास्त्रे राखून ठेवत असल्याचे दिसते.
इस्रायलचा दावा आहे की त्यांनी इराणचे १५० मिसाइल लाँचर्स उद्ध्वस्त केले आहेत. मात्र, अमेरिकेने या भागात दीर्घकाळ युद्ध चालेल इतका साठा आधीच पाठवला नसल्याचे संकेत मिळत आहेत. इराणकडून एवढा कडवा प्रतिकार होईल, याची अपेक्षा अमेरिकेने केली नव्हती. त्यामुळे काही दिवसांचा शस्त्रसाठा अमेरिकेकडे होता. मात्र, आता युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.
सध्या इराणची हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense) कमकुवत झाली असून रशियाकडून मिळालेली आधुनिक S-300 सिस्टिमही निकामी झाली आहे. यामुळे अमेरिकन आणि इस्रायली लढाऊ विमाने इराणच्या आकाशात विनाअडथळा वावरत आहेत. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर काही दिवसांत दोन्ही बाजूंकडे हल्ल्यासाठी किंवा बचावासाठीची साधने संपून युद्ध ठप्प होण्याची शक्यता आहे.
